जालना : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच जालना जिल्ह्यातील तीन ठिकाणी शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने मेळावे घेतले. बदनापूर विधानसभा मतदारसंघातील रमानगर आणि घनसावंगी मतदारसंघातील मंगू जळगाव येथे हे मेळावे झाले. यापूर्वी या तीनही विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनेचा प्रभाव राहिलेला आहे. जालना जिल्ह्यात विधानसभेचे पाच मतदारसंघ असून, यापूर्वी जेव्हा शिवसेना-भाजपा युती होती त्यावेळी हे तीन विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होते, तर भोकरदन आणि परतूर हे दोन विधानसभा मतदारसंघ भाजपकडे होते.
१९९० पासून २०१४ पर्यंत जालना, बदनापूर आणि सध्याचा घनसावंगी विधानसभा मतदारसंघ कधी ना कधी शिवसेनेचा प्रतिनिधी निवडून देणारा राहिलेला आहे. २००९ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना होईपर्यंत सध्याच्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा भाग त्यावेळच्या अंबड विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर समाविष्ट होता. १९९५ मध्ये या भागातून शिवसेनेचे शिवाजीराव चोथे विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतरच्या पाचही निवडणुकांत या भागातून शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय होऊ शकला नाही. परंतु, या भागातील शिवसेनेचे अस्तित्व मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून, तसेच संघटनात्मक कामांमुळे मात्र कमी-अधिक प्रमाणावर राहात आलेले आहे. त्यामुळे, घनसावंगी तालुक्यातील मंगू जळगाव येथे आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने मेळावा घेतला. विशेष म्हणजे, मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून गेल्या डिसेंबरमध्ये उद्धव ठाकरे यांनी घनसावंगी येथे हजेरी लावली होती. राष्ट्रवादीच्या या पट्ट्यात गेल्या दोन महिन्यांत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे दौरे झाले आहेत.
हेही वाचा – बाळासाहेब थोरात यांना पक्षाचे बळ
जालना विधानसभा मतदारसंघ, स्थानिक नगरपरिषद आणि या भागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये १९९० पासून शिवसेनेने आपला प्रभाव दाखविला आहे. सध्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात उपनेते असलेले अर्जुनराव खोतकर या मतदारसंघातून चार वेळेस निवडून आले होते आणि दोन वेळेस राज्यमंत्री राहिलेले आहेत. जालना नगरपरिषदेचे अध्यक्षपदही यापूर्वी अनेकदा शिवसेनेकडे राहिलेले आहे. खोतकर बाळासाहेबांची शिवसेना पक्षात गेल्यामुळे या विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाची जबाबदारी आता त्या पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्यावर आलेली आहे. अंबेकर हे नगरपरिषदेच्या राजकारणातून पुढे आलेले पुढारी आहेत. या भागातील रामनगर येथे आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने झालेला मेळावा आपली पक्ष-संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशानेच होता.
आदित्य ठाकरे यांचा आणखी एक मेळावा झालेले सोमठाणा हे गाव शिवसेनेच्या यापूर्वी प्रभाव राहिलेल्या बदनापूर विधानसभा मतदारसंघातील आहे. या मतदारसंघातून १९९०, १९९५ आणि १९९९ अशा सलग तीन विधानसभा निवडणुकांत कै. नारायणराव चव्हाण शिवसेनेकडून निवडून आले होते. तर मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ मध्ये शिवसेनेचे संतोष सांबरे या मतदारसंघातून निवडून आले होते. शिवसेनेचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यही बदनापूर तालुक्यातून अनेक निवडणुकांत मोठ्या प्रमाणावर निवडून आलेले आहेत.
हेही वाचा – वादग्रस्त मंत्री संजय राठोड यांचे स्थान अधिक पक्के
या तीनही मेळाव्यांत आदित्य ठाकरे यांनी प्रामुख्याने राज्यपातळीवरील शिंदे गटास लक्ष्य केले. राज्याबाहेर गेलेले उद्योग, शिंदे सरकारच्या काळातील मुंबईमधील रस्त्यांवरचा खर्च आणि पक्षातून बाहेर पडलेल्या आमदार-खासदारांवर त्यांनी या मेळाव्यांत टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरळीतील सभेवरूनही त्यांनी टीका केली. ते म्हणाले, मंत्र्यांची फौज घेऊन मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली. परंतु, त्यांना रिकाम्या खुर्च्यांसमोर बोलावे लागले. शिवसेना, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना संपवण्यासाठी आपण निघालो आहोत हे एकदा जाहीरपणे सांगण्याची हिंमत मुख्यमंत्री शिंदे यांनी दाखवावी, असे आव्हान त्यांनी या शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने दिले.