‘शिवसंवाद’ च्या पहिल्या टप्प्यात शिवसेनेतील फुटीनंतर ‘गद्दार’ हा शब्द रुजविल्यानंतर आता पुन्हा युवासेना नेते आदित्य ठाकरे नाशिक व मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्यांतील काही गावांमध्ये ते संवाद करणार आहेत. फुटीनंतर शिवसेनेविषयी वाढलेली सहानुभूती कायम ठेवणे, हे आता नेत्यांसमोरचे आव्हान आहे. यातील काही गावांमध्ये आता नव्याने कोणत्या विषयावर व कसा संवाद होतो यावर निवडणुकीची समीकरणे ठरू शकतील, असे सांगण्यात येत आहे. फुटून गेलेल्या आमदार आणि मंत्र्यांच्या मतदारसंघात बांधणीचा हा दुसरा टप्पा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मतदारसंघातील मुंढेगाव येथून संवाद कार्यक्रमास सुरुवात होणार असून, औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील गावांची निवडही आता पूर्ण झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघात महालगाव येथे मराठवाड्यातील पहिला शिवसंवाद कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर आदर्श पाटोदामध्येही संवाद कार्यक्रम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या शिवसंवाद कार्यक्रमात रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांच्या नातेवाईकांनी कसे मद्य विक्रीचे परवाने मिळविले, याची बिंग आदित्य ठाकरे यांनी फोडले होते. पैठण तालुक्यातील नागरिकांच्या तोंडून काढून घेतलेल्या माहितीच्या आधारे मंत्री भुमरे यांना बदनाम करण्यात शिवसेनेला यश मिळाले होते.
हेही वाचा – कसब्यात बहुजनांचे प्राबल्य
हेही वाचा – तेलंगणातील दुसरा पक्ष राज्यात जम बसविणार का ?
जालना जिल्ह्यात अर्जून खोतकर यांना अपरिहार्यपणे बाळासाहेबांची शिवसेना गटात जावे लागले. त्यामुळे जालना येथे शिवसेनेला नवी बांधणी करणे आवश्यक होते. बीड जिल्ह्यात शिवसेनेला अद्यापि पाय रोवता आले नाही. पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये मिळणारी वागणूक पाहता शिवसेनेला विस्तार करण्यासाठी पोकळी असल्याने आदित्य ठाकरे यांचा हा दौरा राजकीयदृष्ट्या अधिक महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आदित्य ठाकरे यांच्यासमवेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हेही उपस्थित राहणार आहेत.