गोंदिया : राज्य मंत्रिमंडळात गोंदिया जिल्ह्याला स्थान मिळाले नाही, त्यावेळीच जिल्ह्याला बाहेरील पालकमंत्री मिळणार, हे निश्चित झाले होते. पण ते किती लांबचे असणार यावर जिल्ह्यात विविध नावांची चर्चा होती. शनिवारी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. नवे पालकमंत्री हे लातूर जिल्ह्यातील असून तिथून ते आता जिल्ह्याचा कारभार पाहणार आहेत.
जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहे. महादेवराव शिवणकर आणि राजकुमार बडोले वगळता आतापर्यंत जिल्ह्याला लाभलेले सर्व पालकमंत्री हे बाहेरील होते. तर चार वर्षांत सहा पालकमंत्री मिळाल्याचा इतिहासही जिल्ह्याच्या नावावर आहेच. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात चारही आमदार महायुतीचेच निवडून आले. त्यामुळे यापैकी तीनदा निवडून आलेले भाजपचे आमदार विजय रहांगडाले किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री राजकुमार बडोले यापैकी एकाची तरी मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी अपेक्षा जिल्हावासीयांना होती. पण, तसे झाले नाही.
सहकार मंत्री पाटील हे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर मतदारसंघाचे आमदार. त्यांना जिल्ह्यातील प्रश्नांचे गांभीर्य कळणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळालाही पडला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार अशी चर्चा होती. ती चर्चा खरी ठरली. जिल्ह्याला आतापर्यंत अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे, धर्मरावबाबा आत्राम, हे परजिल्ह्यातील पालकमंत्री मिळण्याची पंरपरा कायम आहे. नवे पालकमंत्री पाटील यांच्यासमक्ष जिल्हावासीयांचा विश्वास संपादन करण्याचे, चारही आमदारांना सोबत घेऊन चालण्याचे तसेच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचे आव्हान असणार आहे.
हे ही वाचा… कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना-भाजपमध्ये तह, हसन मुश्रीफ यांना धक्का
पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचाच वरचष्मा
जिल्ह्यातील चारपैकी तीन आमदार भाजपचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसमुक्त मोहीम जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्यानेच यशस्वी झाली, असे सर्वांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकमंत्री निवडीतही राष्ट्रवादी काँग्रेसचाच वरचष्मा दिसून आला. खासदार पटेल यांच्यामुळे बाबासाहेब पाटील यांची पालकमंत्रीपदी निवड झाली. यामुळे जिल्ह्याच्या विकासाची जवाबदारी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावरही असेल. जिल्ह्याचा आता गतीमान विकास होईल, अशी अपेक्षा गोंदियाकरांना आहे.