भगवान मंडलिक
डोंबिवली : दुकानावर मराठी पाट्या, मराठी तरुणांना नोकरीत प्रथम प्राधान्य हे विषय घेऊन मनसेची वाटचाल सुरू असली तरी आगामी कल्याण डोंबिवली महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुका विचारात घेऊन मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील यांनी डोंबिवली, कल्याण ग्रामीण नेत्यांनी आता उत्तर भारतीय समाजाला आपल्याकडे आकृष्ट करण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी डोंबिवलीतील सागाव-चेरानगर भागातील २०० उत्तर भारतीयांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. आगामी निवडणुकीतील सत्ताकारणात आपली गाडी रूळावरून घसरू नये यासाठी मनसेच्या इंजिनला उत्तर भारतीय मतपेढीचे डबे जोडण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हे पक्षीय काम मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे राज्यातील एकमेव आमदार असल्याने खास मर्जीतले असलेले कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील यांचे बंधू कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विनोद पाटील यांनी आणि सहकाऱ्यांनी केले आहे.
हेही वाचा… रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसैनिकांचा बंडखोर नेत्यांना झटका
रेल्वे भरतीमध्ये मराठी तरुणांना प्राधान्य मिळालेच पाहिजे, या विषयावर ऑक्टोबर २००८ मध्ये उत्तर भारतामधून रेल्वे भरतीसाठी आलेल्या तरुणांना मनसेच्या कल्याण, डोंबिवलीतील कार्यकर्त्यांनी कल्याण रेल्वे स्थानक भागात मारहाण केली होती. हे लोण मग राज्याच्या विविध भागात पसरले होते. तेव्हापासून परप्रांतीयांच्या मनात मनसेविषयी दुरावा निर्माण झाला होता. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनीही या दुराव्याची कधीही पर्वा न करता नेहमीच मराठीचा मुद्दा आक्रमकपणे मांडून मराठी तरुणांना नोकरीत प्राधान्य मिळालेच पाहिजे, हे ठासून सांगितले होते.
हेही वाचा… सुजय विखे – नीलेश लंके यांच्यातील खडाखडीने नगरचे राजकारण तापले
डोंबिवली जवळील कल्याण शिळफाटा रस्त्या लगतचा सागाव, सोनारपाडा, माणगाव, पिसवली, दावडी गाव हद्दीत उत्तर भारतीय समाज अधिक संख्येने राहतो. या भागातील ग्रामपंचायतींमध्ये यापूर्वी या समाजाने सदस्य म्हणून नेतृत्व केले आहे. रिक्षावाले, भाजीपाला विक्री, पानटपरी, सुतारकाम करणारा मोठा परप्रांतीय वर्ग डोंबिवली, कल्याण परिसरात आहे. डोंबिवली एमआयडीसीत कोणत्याही कामगार संघटनेच्या भानगडीत न पडता काम करणाराही हाच वर्ग अधिक संख्येने आहे. त्यामुळे मतदार याद्यांमधील परप्रांतीय वर्गाची संख्या झपाट्याने वाढत आहे हे लक्षात घेऊन या वर्गाला दुर्लक्षित आणि दुखावून दूर न ठेवता जवळ करण्याचा प्रयत्न आता मनसेने चालविला आहे.
हेही वाचा… भारत जोडो यात्रेत शरद पवार, उद्धव ठाकरे सहभागी होणार; काँग्रेस नेत्यांचे स्वीकारले निमंत्रण
डोंबिवली शहरापेक्षा कल्याण ग्रामीण शिळफाटा, २७ गाव भागात इमारती, चाळीत स्वस्तात घर मिळत असल्याने या भागात परप्रांतीय वर्गाची सर्वाधिक वस्ती आहे. येत्या काळात विधानसभा, लोकसभा निवडणुकीत परप्रांतीय वर्गाचे महत्व अधिक असल्याने मनसेने आतापासून या वर्गाला पक्षात प्रवेश देऊन त्यांना जवळ करण्यास सुरुवात केली असल्याचे कळते. उत्तर भारतीयांचे यापूर्वीचे काँग्रेस नेते आता भाजप, शिवसेनेत दाखल होत आहेत. या नेत्यांचा आदेश येण्यापूर्वीच स्थानिक परप्रांतीयांना जवळ करावे अशी आखणी मनसेने केली आहे. हा वर्ग महाराष्ट्रात येत्या निवडणुकांमध्ये भाजपच्या मागे जाण्याची शक्यता असल्याने आता सुशेगात असलेल्या उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना आणि सत्तेच्या गरमीत असलेल्या भाजप नेत्यांना गाफील ठेऊन मनसेने उत्तर भारतीय स्थानिक पदाधिकारी, नेते यांना हाताशी धरून त्यांच्या हाती मनसेचा झेंडा देण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा… विश्लेषण : हिजाब कधी हवा कधी नको? इराणमधील महिलांच्या हिजाब आंदोलनाचा इतिहास काय?
येत्या काळात कल्याण लोकसभेसाठी भाजपचा उमदेवार असेल. त्याला तोडीस तो़ड देण्याची धमक मनसेच्या काटई येथील आमदार पाटील घराण्यात आहे. त्यामुळे प्रसंगी आमदार प्रमोद पाटील हे कल्याण लोकसभेत भाजप उमेदवाराचे प्रतिस्पर्धी असतील आणि त्यांचे बंधू नेहमीच पडद्या मागून राजकारण करणारे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विनोद पाटील हे आता राजकीय मंचावर येऊन सक्रिय झाले आहेत. आमदार पाटील यांची दिल्लीची तयारी असेल तर कल्याण ग्रामीणची विधानसभेची जबाबदारी बंधू विनोद पाटील यांच्यावर टाकली जाण्याची शक्यता आहे. त्या तयारीची रंगीत तालीम आता सुरू झाली आहे.