मुंबई : मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्षपद अनेक दिवस रिक्त असल्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कान टोचल्यावर नवीन अध्यक्ष नेमण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यापासून मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्षपद रिक्त आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून माजी नगरसेवक राखी जाधव आणि नरेंद्र वर्मा यांना कार्याध्यक्ष म्हणून नेमून त्यांना मुंबईतील प्रत्येकी तीन जिल्ह्यांची जबाबदारी दिली.
नवाब मलिक यांची कारावासातून लवकर सुटका होईल या अपेक्षेने मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष पद रिक्त ठेवण्यात आले होते. मात्र मलिक यांची अद्याप सुटका झाली नाही. त्यातच आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकींचा विचार करता मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्णवेळ अध्यक्ष असणे ही राष्ट्रवादीची गरज असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईत पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात भाषण करताना मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष का वाढला नाही, असा सवाल करीत पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्याची पक्षश्रेष्ठींना जाणीव करून दिली. अजित पवारांच्या या वक्तव्याने मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवडीची चर्चा सुरू झाली. विद्यमान कार्याध्यक्षा राखी जाधव यांनाच अध्यक्ष नेमावे अशी चर्चा सुरू झाली. तर नरेंद्र राणे यांनादेखील अध्यक्ष करावे, असे एका गटाचे मत असताना नरेंद्र वर्मा यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे आले आहे. त्यांनी यापूर्वीही अध्यक्षपद भूषविले होते.
मुंबईत अनेक प्रयत्न करूनही राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद वाढू शकलेली नाही. याबद्दलही अजित पवार यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. नवीन अध्यक्ष नेमून पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न आहे.