नागपूर : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात विदर्भातील नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काही नेते उघडपणे बोलू लागले आहेत तर काहींनी पडद्याआडून नाराजीचे सूर आळवले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ १६ जागा मिळाल्या आहेत. विदर्भात केवळ नऊ जागा पक्षाला जिंकता आल्या. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही निसटता विजय झाला. काँग्रेसचा हा आजवरचा सर्वांत मोठा पराभव आहे. निवडणूक निकाल येताच पटोलेंनी दिल्ली गाठून पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. श्रेष्ठींनी त्यांना अभय दिल्याचे चित्र निर्माण झाले. पण, या पराभवासाठी पटोले यांना पक्षातील काही नेते जबाबदार धरत आहेत. पटोले यांच्या कार्यपद्धतीमुळे आणि उमेदवारी वाटपातील घोळामुळे हा पराभव झाल्याचा दावा त्यांचे पक्षांतर्गत विरोधक करीत आहेत. त्याची ठिणगी मुंबईत झालेल्या बैठकीत पडली.

हेही वाचा >>> अंतर्गत वादांमुळेच पराभव; काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून नेत्यांची खरडपट्टी

निवडणुकीत पराभूत झालेल्या काही उमेदवारांनी या बैठकीत प्रदेश नेतृत्वावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. त्याच दिवशी मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार व युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके यांनी नाना पटोले यांच्यावर तोफ डागली. त्यांनी निवडणुकीत पक्षातील प्रदेश नेत्यांकडून मदत मिळाली नसल्याचा आणि पटोले हे संघाचे ‘एजन्ट’ असल्याचा आरोपही केला. शेळके यांनी हे आरोप केले असले तरी त्यामागे काँग्रेसचे विदर्भातील बडे नेते असल्याची चर्चा आहे. निवडणूक निकाल येताच विदर्भातील काही मुस्लीम कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती.

हेही वाचा >>> Will MVA Fall Apart: मविआ फुटणार? दोन पक्षांमधून स्वतंत्र लढण्याची भूमिका, तिसऱ्याचं मौन! नेमकं काय घडतंय?

प्रदेश काँग्रेसवरील वर्चस्वासाठी प्रयत्न

विधानसभा सदस्यांची संख्या कमी असल्याने विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळण्याची शक्यता नाही. येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसवर आपले नियंत्रण असावे म्हणून विदर्भातील काही नेते प्रयत्नशील आहेत. यातून नाना पटोले यांच्याविरोधात मोर्चेबांधणी केली जात असल्याचे बोलले जात आहे. पुढील काळात पटोलेविरोधी मोहीमला अधिक वेग येण्याची शक्यता असून ते कसे मात करतात हे बघणे औत्सुक्याचे असेल. तूर्तास त्यांना पक्षश्रेष्ठींकडून अभय मिळाल्याचे दिसून येत आहे.

“बंटी शेळके यांनी काय आरोप केले हे माहिती नाही. पक्षश्रेष्ठी उमेदवार ठरवते. त्यासाठी प्रदेश नेतृत्व शिफारस करते. शेळके लढवय्ये आहेत. मात्र त्यांचा उद्वेग कशामुळे झाला याची कारणे शोधली पाहिजे. पक्षश्रेष्ठींच्या कानावर झालेला प्रकार टाकणार आहे.” – विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते

“शेळकेंचे आरोप ही पक्षांतर्गत बाब आहे. त्यावर आत्ता बोलणे उचित नाही. याबाबत नंतर बोलणार.” – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस</p>

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After congress defeat in the assembly elections lobbying against nana patole in vidarbha print politics news zws