काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा जेव्हा काश्मीरमध्ये समारोप होईल, तेव्हा भारतीय जनता पार्टीची ‘अंतिम यात्रा’ सुरू होईल, असं गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटलं आहे.

“मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शाखांकडून द्वेषाचे धडे घेतले आहेत. भारताच्या स्वातंत्र्यात आणि गोवा मुक्तीमध्ये काँग्रेसचे योगदान समजून घेण्यासाठी त्यांनी भारताचा इतिहास शिकला पाहिजे.” असंही पाटकर म्हणाले.

कर्नाटकात उडुपी येथे मुख्यमंत्री सावंत यांनी केलेल्या विधानावर प्रत्युत्तर देताना पाटकर यांनी हे वक्तव्य केलं आहे. “काँग्रेसने १९४७ मध्ये भारत जोडो यात्रा काढली असती तर गोवा लवकर मुक्त होऊ शकला असता.”, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले होते.

यावर “१९७३ मध्ये जन्मलेल्या आणि द्वेष, जातीय संघर्ष व फुटीरतावादी राजकारणाचे धडे घेत शाखांमध्ये आपला वेळ घालवलेल्या व्यक्तीकडून तुम्ही काय अपेक्षा करू शकता?” असा सवाल अमित पाटकर यांनी केला.

हेही वाचा : राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार का? शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले…

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला प्रारंभ झाला आहे. एकूण १२ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशातून ही यात्रा जाणार आहे. तर महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथे यात्रेचे आगामन होणार आहे. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या मोठय़ा सभा घेण्याचे प्रदेश काँग्रेसचे नियोजन आहे.

राहुल गांधी यांचा महाराष्ट्रात १६ दिवसांचा मुक्काम –

भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांचा १६ दिवसांचा महाराष्ट्रात मुक्काम राहणार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ३८३ किलोमीटर पदयात्रा काढण्यात येणार आहे. दरोज २५ किलोमीटर गांधी स्वत: या पदयात्रेतून चालणार आहेत. प्रमुख नेते, पदाधिकारी यांच्यासह दररोज शंभर कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहणार आहेत. २५ किलोमीटरचा प्रवास जिथे संपेल ते मुक्काम करणार आहेत. विशेष म्हणजे १६ दिवसांच्या दौऱ्यात राहुल गांधी कुठेही हॉटेलमध्ये मुक्काम करणार नाहीत, तर तंबु टाकून त्यात मुक्काम करणार आहेत. मुक्कात ते त्या परिसरातील शेतकरी, विविध समाज घटक, महिला बचत गट यांच्याशी संवाद साधणार आहेत.