उमाकांत देशपांडे
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढणार असून शिंदे गटाकडे ५० हून अधिक जागा लढण्यासाठी नेतेच नाहीत, असे युतीतील जागावाटपाबाबत संयम न ठेवता वक्तव्य केल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगेच सारवासारव करावी लागली. चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष असताना केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे भाजपची पंचाईत झाली, तशीच वेळ बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे यावेळी भाजपवर आली.
पक्षाचे प्रवक्ते, समाज माध्यमे आणि प्रसिध्दीमाध्यमे पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत शुक्रवारी बोलताना बावनकुळे यांनी भाजप २४० जागा लढविणार असल्याचे सांगून पदाधिकाऱ्यांनी रात्रंदिवस काम करीत निवडणूक तयारीला लागावे, अशा सूचना दिल्या. शिंदे गटाकडे ५० हून अधिक आमदार नसल्याने त्याहून अधिक जागा लढण्यास माणसेच नाहीत, असेही बावनकुळे यांनी नमूद केले. त्यांचे भाषण समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आले होते. भाजप २४० जागा लढणार असल्याने शिंदे गटाला ४८ जागाच मिळतील, असा वक्तव्याचा अर्थ काढला गेला आणि शिंदे गटाकडूनही भाजप नेत्यांकडे नाराजी व्यक्त करण्यात आली. जागावाटपाच्या अंतिम चर्चा झाल्या नसताना अकारण त्याचे सूत्र खुद्द प्रदेशाध्यक्षांनीच जाहीर केल्याने ही बाब पक्षश्रेष्ठींपर्यंत गेली. त्यांनीही नाराजी व्यक्त केल्याने युतीतील जागावाटप झालेच नसल्याची सारवासारव बावनकुळेंना रात्रीच करावी लागली. आम्ही २४० मतदारसंघात तयारी केली, तरी जागावाटपात शिंदे गटाला ज्या अधिकच्या जागा मिळतील, तेथे त्यांना आमच्या तयारीचा उपयोग होईल, असे बावनकुळे यांनी नमूद केले. वास्तविक भाजप शिंदे गटाबरोबर निवडणुका युतीत लढणार असला, तरी २८८ मतदारसंघात पक्षपातळीवर निवडणूक तयारी करीत असल्याचे आधीच जाहीर झाले आहे. पण तरीही बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण केले. त्यांचे भाषण समाज माध्यमांवरून काढून टाकण्याच्या सूचना ज्येष्ठ नेत्यांनी दिल्या आणि रात्रीच ते तातडीने काढले गेले.
हेही वाचा… छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतरावरून राजकीय लाभाची गणिते
भाजप २०० हून अधिक जागा लढविणार असून शिंदे गटाला ६०-७० जागांपेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. मनसेशी युती करण्याचे भाजपने ठरविले असले तरी ही युती थेट भाजपशी न होता, शिंदे गटामार्फत होईल व त्यांच्या कोट्यातून काही जागा दिल्या जातील. मात्र कोणत्या व किती जागा शिंदे गटाला द्यायच्या हे अंतिम झाले नसताना अाणि वरिष्ठ पातळीवर चर्चा होत असताना बावनकुळे यांनी भाजप २४० जागा लढविणार असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे युतीतील जागावाटप झाल्याची चर्चा सुरू झाली आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली.
हेही वाचा… ‘हात जोडो’ अभियानातून पश्चिम विदर्भात संघटना बळकटीचा काँग्रेसचा प्रयत्न
कोणत्याही नेत्याने व पदाधिकाऱ्याने ऊठसूठ कोणत्याही विषयावर बोलू नये, अशी तंबी बावनकुळे यांनी आपल्या भाषणात दिली होती. मात्र त्यांच्याच वक्तव्याने वाद निर्माण झाला. ‘ मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्य मंत्री केले, ‘ यासह माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अनेक वक्तव्यांमुळे भाजपची पंचाईत झाली होती. आता बावनकुळे यांनाही संयम ठेवण्याच्या सूचना ज्येष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.