Bihar Assembly Election 2025: गेल्या चार महिन्यांत हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यानंतर आता काही महिन्यांतच बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी आता काँग्रेसने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, बिहारमध्ये काँग्रेस राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचा भाग म्हणून आगामी विधानसभा निवडणुका लढवेल.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या काही आठवड्यात विविध कार्यक्रमांनिमित्त दोनदा बिहारचा दौरा केला आहे. असे असले तरी, बिहारमधील काँग्रेसची संघटनात्मक अजूनही डळमळीत असल्याचे दिसत आहे. पक्ष नेतृत्वाने २०१७ पासून बिहार प्रदेश काँग्रेस समितीची कार्यकारी समिती स्थापन केलेली नाही. मात्र, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांनी डिसेंबर २०२२ मध्ये अखिलेश सिंग यांना बिहारचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती.
काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, बिहार काँग्रेसमध्ये गेल्या आठ वर्षांपासून प्रमुख प्रदेश काँग्रेस समिती अस्तित्वात नाही. बिहार काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, त्यांनी प्रदेश काँग्रेस समिती अस्तित्वात नसल्याची बाब पक्षाच्या वरिष्ठांना कळवली होती, परंतु “त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही”. “मी अनेक नेत्यांना सांगितले होते की, जर आपल्याला विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करायची असेल तर बिहारमध्ये पक्ष संघटना मजबूत करावी लागेल. पण मला यावर कोणतेही उत्तर मिळाले नाही.”
बिहार काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष ब्रजेश पांडे म्हणाले की, प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी समिती लवकरच स्थापन केली जाईल.
अनेक वर्षांपासून बिहारमध्ये काँग्रेसची कामगिरी निराशाजनक
गेल्या अनेक वर्षांपासून बिहारच्या अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी निराशाजनक राहिली आहे, बिहारमध्ये लालू प्रसाद नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाचा प्रभाव आहे. त्यामुळे बिहारमध्ये काँग्रेस पक्ष त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
दरम्यान, २०२० मध्ये झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने ७० पैकी १९ जागा जिंकल्या होत्या, तर त्यांचा ज्येष्ठ मित्रपक्ष राजदने १४४ पैकी ७५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. असे असले तरी १४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत एनडीएने १५ जागा जास्त मिळल्या होत्या. यानंतर खराब स्ट्राइक रेटसाठी काँग्रेसवर खूप टीका झाली होती.
लोकसभा निवडणुकीतील कामगिरी
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत, काँग्रेसने लढवलेल्या नऊ जागांपैकी तीन जागा जिंकल्या होत्या. यामध्ये राजदने लढवलेल्या २३ पैकी चार जागा जिंकल्या होत्या, तर त्यांचा मित्रपक्ष सीपीआयने (एमएल) तीन पैकी दोन जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे एनडीएने ४० पैकी ३० जागा जिंकल्या होत्या.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असल्याने, काँग्रेस नेतृत्वावर आता राजदसोबत सन्मानपूर्वक युती करण्याचा आणि त्यांच्या प्रदेश काँग्रेसला बळकटी देण्यासाठी दबाव वाढत आहे.
जनसुराज्य पार्टीचे आव्हान
काँग्रेस आणि त्यांच्या महाआघाडीतील मित्रपक्षांसाठी आणखी एक चिंता जनसुराज पार्टीच्या रूपात समोर आली आहे, ज्याची स्थापना निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केली आहे.बिहारमध्ये पक्षाची उभारणी करताना, किशोर हे दलित आणि मुस्लिमांसारख्या समुदायांवर लक्ष केंद्रित करत असल्याचे म्हटले जाते, जे महाआघाडीच्या मतपेढीचा प्रमुख आधार आहेत.