पिंपरी : लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. शहरातील १५ ते २० माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे लवकरच अजित पवार गटाला मोठी गळती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड अजित पवारांचा बालेकिल्ला होता. सलग १५ वर्षे तेच शहराचे ‘दादा’ होते. परंतु, २०१७ मध्ये राष्ट्रवादीतून भाजपत गेलेल्या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आणली. मात्र, जुलै २०२३ मध्ये पवारच शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी झाले आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडले. पक्षातील फुटीनंतर शहरातील संघटना, आमदार, सर्व माजी नगरसेवक अजित पवारांसोबत कायम राहिले. केवळ दोन माजी नगरसेवक शरद पवार यांच्याबरोबर राहिले.

आणखी वाचा-हंगामी अध्यक्ष पदाच्या निवडीवरुन विरोधकांना आक्षेप का? संसदीय संकेत अव्हेरण्यात आलेत का?

पक्षातील फुटीनंतर दोन्ही गटांनी बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शहरात लक्ष घातले. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वारे बदलले. महाविकास आघाडीच्या बाजूने जनमत असल्याचे दिसल्याने अजितदादांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. अजित पवार गटाचे प्रवक्ते, माजी नगरसेवक विनायक रणसुभे, भाजपच्या माजी नगरसेविका प्रियंका बारणे यांनी नुकताच पवार गटात प्रवेश केला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते, पदाधिकारी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करत आहेत. गेल्या दोन दिवसांत चिंचवड, भोसरीतील १५ ते २० माजी नगरसेवकांनी शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीला मोठी गळती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच महापालिकेत शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलेला एक पदाधिकारीही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून पवार गटाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादीतून आलेले आमदार महेश लांडगे, शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार अश्विनी जगताप यांच्यामुळे शहरात भाजपची ताकद दिसते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे खासदार असले, तरी शहरात दोन्ही शिवसेनेची ताकत मर्यादितच आहे.

आणखी वाचा-राहुल गांधींची नवीन ‘व्हाईट टी-शर्ट’ मोहीम काय आहे? या मोहिमेचा उद्देश काय?

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घातले आहे. आमदार रोहित पवार यांच्याकडे शहराची जबाबदारी सोपविली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे याही शहरातील राजकारणाकडे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील अनेकांचा पवार गटाकडे ओढा वाढल्याचे दिसते. बारामतीनंतर अजित पवार यांना पिंपरी-चिंचवडमध्ये घेरण्याची रणनीती पवार गटाने आखल्याची जोरदार चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पाठिशी जनता असल्याचे दिसले. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही माजी नगरसेवक कोणाच्या संपर्कात नाही. मी शरद पवार यांची भेट घेतली नाही. परंतु, भोसरीतून विधानसभा निवडणूक लढविण्याची माझी तयारी सुरू आहे. -अजित गव्हाणे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

शहरातील सर्वपक्षीय २० माजी नगरसेवक संपर्कात आहेत. काहींनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. योग्य वेळी योग्य निर्णय होतील. -तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After defeat of ajit pawars ncp in pimpri chinchwad former corporators office bearers are uneasy print politics news mrj
First published on: 23-06-2024 at 16:13 IST