वसंत मुंडे
बीड : पाच वर्षात मी खूप फिरले, पक्षासाठी कामही केले. पण प्रत्येकवेळा लोकांना आशा लागते आणि पदरी निराशा पडते. मग मी पक्ष बदलणार का, काय निर्णय घेणार? असे प्रश्‍न उपस्थित केले जातात. पण माझी निष्ठा एवढी लेचीपेची नाही. मी युध्दाला तयार आहे, असे सांगत कृष्णाला सुध्दा मथुरा सोडून द्वारकेत जावे लागले. तशीच परिस्थिती आज निर्माण झाली आहे. लोकांच्या मनात प्रश्‍न आहे, त्याचे उत्तर मी शोधते आहे. अशा शब्दात मनातील खदखद व्यक्त केल्याने पंकजा मुंडे वेगळा राजकीय मार्ग निवडतील का, असे अंदाज बांधले जात असले तरी त्यांनी नेहमीप्रमाणे पक्ष नेतृत्वाकडून होणार्‍या अन्यायाचा पाढा वाचताना कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर न केल्याने संभ्रमच वाढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट ता.पाटोदा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा झाला. मागच्या पाच वर्षापासून प्रदेश नेतृत्वाकडून डावलले जात असल्याची खदखद पंकजा मुंडे यांच्या नाराजीतून आणि समर्थकांच्या रोषातून सातत्याने व्यक्त होते. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा यांच्याकडे राजकीय वारसा आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली होती. मात्र मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा यांनी पुन्हा संघर्ष यात्रा काढून पक्षाला सत्तेपर्यंत पोहचवण्यासाठी योगदान दिल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री असा दावा केला होता. तर एका कार्यक्रमात मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे जाहीर व्यक्तव्य केल्यानंतर पक्षांतर्गत नेतृत्वाची स्पर्धा तीव्र झाल्याचे अनेक घटनांवरुन समोर आले. पाच वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी पक्षातील नेत्यांनीच राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांना रसद पुरवून आपला पराभव केल्याचा आरोप करत पराभवाचे खापर पक्ष नेतृत्वावरच फोडले. तेंव्हापासून प्रदेश पातळीवर पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला.

हेही वाचा… नागपूर शहरातील काँग्रेसमधील वादविवादाची परंपरा जुनीच

पंकजा समर्थकांनी समाज माध्यमातून तसेच जाहीर कार्यक्रमांतून अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. पक्षाने पंकजा यांना मध्यप्रदेशचे सहप्रभारी करुन राज्याच्या राजकीय प्रक्रीयेतून पूर्णपणे बाजुलाच केले. डॉ.भागवत कराड, रमेश कराड यांना संधी देत भाजपातील मुंडे समर्थकांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. जाहीर पणे अपेक्षा व्यक्त करुनही विधानपरिषदेवर पुनर्वसन न झाल्याने पंकजा यांची नाराजी लपून राहिली नाही. काही महिन्यापूर्वी तर राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाल्याने परळी मतदारसंघातील विद्यमान आमदार धनंजय मुंडे भाजपबरोबर आले. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात विद्यमान आमदाराला जागा सुटल्यानंतर पंकजा यांना मतदारसंघच बदलावा लागेल अशी चर्चा सुरू झाली. तर पक्ष नेतृत्वाकडुनही लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांना संकेत दिल्याचे सांगितले जाते. या पार्श्‍वभूमीवर दोन महिन्याची सुट्टी घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परीक्रमा केल्यानंतर त्या वेगळा राजकीय निर्णय घेतील अशी चर्चा सुरू झाली. तर वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर कारवाई झाली. केंद्र सरकारने इतर कारखान्यांना मदत करताना वैद्यनाथ कारखान्याला बाजुला ठेवले यावरुनही भाजप नेतृत्वाबद्दल रोष व्यक्त झाला. या पार्श्‍वभूमीवर दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे काही भूमिका घेतील अशी चर्चा होती.

हेही वाचा… राजकीय कोंडीतून सुटकेसाठी नीलेश राणेंचा राजसंन्यास?

पंकजा यांनीही शेतकरी, शेतमजूर आणि ऊसतोड कामगार यांच्याबाबत थेट प्रश्‍न उपस्थित करुन केंद्र आणि राज्य सरकारवर हल्ला चढवला. तर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक आणि ऊसतोडणी महामंडळावरुनही भाजप नेतृत्वाला खडेबोल सुनावले. आता मी मैदानात उतरणार आहे, चारित्र्यहीन आणि पैशाच्या जोरावर राजकारण करणार्‍यांना मी पाडणार असा इशारा देत अप्रत्यक्षपणे वेगळ्या राजकीय वाटेचे संकेत दिल्याचे मानले जात आहे. मात्र त्यांनी पक्ष नेतृत्वाकडून होणार्‍या अन्यायाचा पाढा वाचताना आणि इशारा देताना नेहमीप्रमाणेच कोणतीही स्पष्ट राजकीय भूमिका जाहीर केली नसल्याने त्यांच्या राजकीय निर्णयाबाबतचा संभ्रम वाढलाच आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After dussehra rally confusion increased around pankaja munde about her political stand print politics news asj
Show comments