RSS Helps UP Police constable examination Candidate: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश राज्यात भाजपाला मोठा धक्का बसला. भाजपाला ८० पैकी फक्त ३३ जागा मिळाल्या. २०१४ आणि २०१९ नंतर भाजपा यावेळी दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष झाला. समाजवादी पक्षाने ३७ जागा जिंकल्यामुळे तो पहिल्या क्रमाकांचा पक्ष बनला. लोकसभेला हाराकिरी होण्याच्या अनेक कारणांपैकी पेपरफुटी प्रकरण एक असल्याचे अंतर्गत विश्लेषणातून समोर आले. पेपरफुटीमुळे सरकारी नोकर भरतीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबियांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. त्यानंतर आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये नोकर भरती होत आहे. यावेळी उमेदवारांच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिरीरीने मैदानात उतरल्याचे दिसत आहे. सत्ताधाऱ्यांचे अपयश पुसून पुन्हा एकदा पेपरफुटीच्या कटू आठवणी विस्मृतीत ढकलण्याचा संघाचा प्रयत्न असल्याचे दिसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परीक्षार्थींसाठी संघाकडून राहण्याची, जेवणाची सोय

लोकसभा निवडणुकीआधी फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेश पोलीस भरतीचे पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे ६०,२४४ पदांसाठी परीक्षेला बसलेल्या ४८ लाख उमेदवारांच्या भरतीच्या अपेक्षा धुळीस मिळाल्या होत्या. आता पुन्हा एकदा २२ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान उत्तर प्रदेशच्या ७५ जिल्ह्यांपैकी ६७ जिल्ह्यात भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी प्रत्येक जिल्ह्यातून हजारो उमेदवार भरतीच्या केंद्रावर येत आहेत. या उमेदवारांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. रेल्वे स्थानक, बसस्थानकावर हेल्प डेस्क उभारणे, उमेदवारांना आवश्यक ती मदत देणे याप्रकारची सहाय्यता संघाकडून देण्यात येत आहे.

हे वाचा >> RSS Annual Meeting: संघाची गरज नाही म्हणणारे जेपी नड्डा RSS च्या बैठकीला उपस्थित राहणार; ‘हे’ आहेत महत्त्वाचे मुद्दे

संघाच्या पदाधिकाऱ्यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, यावेळीही नोकरभरतीसाठी ४८ लाखांच्या आसपास उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे भरतीसाठी हजारो उमेदवार येत आहेत. सर्वांनाच लॉज आणि हॉटेल बुक करणे शक्य होत नाही. त्यामुळे हे युवक रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर राहतात. अशा युवकांना मदत करण्याची भूमिका संघाने घेतली आहे. संघाशी संबंधित सेवा भारती आणि विद्यार्थी कार्य विभागाने उमेदवार आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी संघाचे कार्यालय, सरस्वती शिशू मंदिराच्या वसतिगृहात केली गेली आहे. तसेच पुरूष आणि महिला उमेदवारांसाठी वेगवेगळी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

निवडणुकांशी संबंध नाही, आमचे सामाजिक कार्य

गोरखपूर जिल्ह्यात सेवा भारतीने तीन शाळांच्या संकुलात उमेदवारांची व्यवस्था केली. ज्या महिला उमेदवारांबरोबर पुरूष नातेवाईक आले आहेत, त्यांची व्यवस्था स्वयंसेवकांच्या घरी केली आहे. संघ स्वयंसेवक उमेदवारांचे ओळखपत्र तपासून त्यांना राहण्याची सुविधा देत आहे. रेल्वे स्थानक, बस थांब्यावर स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. याठिकाणी ओळखपत्र पाहून उमेदवारांना मदत दिली जाते. तसेच अल्पोपहार आणि जेवणाची व्यवस्था करून दिली जाते. राजधानी लखनऊमध्येही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पाच ठिकाणी मदतीसाठी हेल्प डेस्क उभारले गेले आहेत.

पूर्व उत्तर प्रदेशचे आरएसएसचे प्रचार प्रमुख सुभाष यांनी सांगितले की, लखनऊ, अयोध्या, काशी, प्रयागराज आणि कानपूर अशा मोठ्या शहरात पोलीस भरतीसाठी येणाऱ्या युवकांना राहण्याची, जेवणाची आणि जेवणाचे पाकिटे वाटण्याची सोय करण्यात आली आहे. यासाठी कोणताही मोबदला घेतला जात नाही. सुविधा पूर्णपणे मोफत आहे. महिला उमेदवारांसाठी शहरांतील शाळांमध्ये वेगळी व्यवस्था केली आहे.

हे ही वाचा >> विधानसभा निवडणुकीत संघ सक्रिय; निर्णय प्रक्रियेत फडणवीसांचे पारडे जड

पेपरफुटी प्रकरणाचे अपयश पुसण्यासाठी हे सर्व केले जात आहे का? असा प्रश्न विचारल्यानंतर सुभाष म्हणाले, “निवडणुकीच्या निकालाचा आमच्या कामाचा काहीही संबंध नाही. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून संघ कोणते काम करत नसतो. आम्ही समाजासाठी काम करतो.” आणखी एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही स्वतःहून हे काम हाती घेतले आहे. जेव्हा संघ थेट लोकांपर्यंत जाऊन काम करतो, तेव्हा त्याचा लाभ आपसूकच भाजपाला होत असतो.

बेरोजगारीच्या प्रश्नाला भिडण्याचा प्रयत्न

बेरोजगारीच्या प्रश्नावर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारला लक्ष्य केले जात असताना संघाने आपली सक्रियता दाखविली आहे. विशेष करून काही दिवसांनी १० विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. यासाठीही ही तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. सरकारकडून रोजगार मेळावे, नियुक्ती पत्र वाटप, तसेच युवकांना टॅबलेट आणि स्मार्टफोन वाटपाचे कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After exam paper leaks dented bjp in uttar pradesh how rss has stepped in to help candidates across state kvg