अविनाश कवठेकर
पुणे : निवडणुकीवेळी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आटापिटा करणाऱ्या नेते मंडळींनी आगामी निवडणुकीपूर्वी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवाळीची नामी संधी साधली आहे. वैयक्तिक भेटीगाठी, पणत्या, सुवासिक साबण-अत्तरे-उटणे आणि दिवाळी फराळाच्या जोडीला मतदारांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रम, सहली, आरोग्य शिबिरे, किल्ला सजावट स्पर्धा आणि खास भेटवस्तूंची रेलचेल असा सरंजाम सध्या मतदार अनुभवत आहेत.
दोन वर्षांनंतर दिवाळी निर्बंधमुक्त होत आहे. गणेशोत्सव आणि दसऱ्यापासून इच्छुकांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी नाना युक्त्या वापरण्यास सुरुवात झाली. सहली, होममिनिस्टर, विनामूल्य देवदर्शन अशा कार्यक्रमांचे स्वरूपही दिवाळी जवळ येताच बदलण्यास सुरुवात झाली. वैयक्तिक भेटीगाठी, समाजमाध्यमातून शुभेच्छा, गरीब, वंचित घटकांसाठी दिवाळीच्या फराळासह जीवनावश्यक वस्तूंचे रास्त दरात किंवा विनामूल्य वाटप आणि वितरण करण्याची तयारी सुरू झाली आहे. दिवाळी पहाट सांस्कृतिक कार्यक्रमही मतदारांसाठी ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रभागांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरात दोन दिवस पावसाने धुमाकूळ घातल्यावर राजकीय पक्षांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याची नामी संधी साधली आहे. नुकसानग्रस्तांना मदतीसाठी राजकीय पक्ष सरसावले. नुकसानग्रस्त भागांचे दौरे, महापालिका अधिकाऱ्यांची भेट, निवेदने आणि पाहणी दौऱ्यांचे आयोजन राजकीय पक्षांकडून सुरू करण्यात आले असल्याने निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षांना मतदारांचा कळवळा आल्याचे दिसून येत आहे.