अकोला : भाजपचे ज्येष्ठ नेते, आमदार गोवर्धन शर्मा यांनी अकोला शहरात तब्बल ४० वर्षे आपला दबदबा कायम ठेवला. राजकीयसह सामाजिक, धार्मिक व कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून त्यांची ‘लालाजी’ या प्रेमळ नावाने वैशिष्ट्यपूर्ण ओळख होती. या दिग्गज नेत्याचे दुर्धर आजाराने निधन झाल्यामुळे भाजपचे राजकीयदृष्ट्या मोठे नुकसान झाले. लालाजींनी निर्माण केलेले अधिराज्य कायम राखण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे राहणार आहे.
सामाजिक, धार्मिक क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत राहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि रामभक्त अशी आमदार गोवर्धन शर्मा यांची ओळख होती. अकोला आणि गोवर्धन शर्मा असे समीकरण गेल्या तीन दशकांमध्ये बनले. विधानसभेवर सहा वेळा विजय मिळवून त्यांनी इतिहास रचला. १९८५ ते १९९५ पर्यंत अकोला नगर परिषदेवर नगरसेवक व सभापती म्हणून ते कार्यरत होते. १९९५ मध्ये ते सर्वप्रथम विधानसभेवर निवडून गेले. मंत्रिमंडळात १९९५ ते १९९७ राज्यमंत्री म्हणून त्यांनी कार्य केले. तळागाळात पक्ष संघटनेची मजबूत बांधणी करून अकोल्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व व दबदबा त्यांनी निर्माण केला. कोणतेही संकट ओढवले तरी धाऊन जाणारी पहिली व्यक्ती म्हणजे गोवर्धन शर्माच. अकोलेकरांच्या प्रत्येक सुख-दु:खात त्यांचा सहभाग असायचा. अनेक वेळा त्यांच्यावर ‘तोरण-मरण’ आमदार अशी टीकाही झाली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत आपल्या मधूर वाणी, साधी राहणी व मदतीसाठी धावून जाण्याच्या वृत्तीने त्यांनी सर्वसामान्यांशी नाळ जोडून ठेवली. संघटनात्मक बांधणी व निवडणुकांमध्ये त्याचा नेहमीच लाभ झाला. सर्वसामान्यांशी जुळून राहण्याचा लोकप्रिय ‘लालाजी पॅटर्न’ कायम ठेवण्यासाठी भाजपला चांगलेच परिश्रम घ्यावे लागणार आहे.
हेही वाचा – समाजवादी पार्टीला मोठा धक्का, मोठे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार!
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघावर भाजपची तटबंदी मजबूत आहे. सलग सहा निवडणुकांमध्ये विजयश्री खेचून आणणाऱ्या गोवर्धन शर्मा यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने कडवी झुंज दिली होती. दोन हजार ६६२ मतांनी आमदार शर्मा यांचा निसटता विजय झाला. त्यानंतर गेल्या चार वर्षांत गोवर्धन शर्मांनी जनाधार मजबूत करण्यावर भर दिला. आता त्यांच्या निधनामुळे जागा रिक्त झाली. ३० वर्षांपासून भाजपचा गड असलेला अकोला पश्चिम मतदारसंघ कायम राखण्यासाठी भाजपला अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.
हेही वाचा – अकोल्यात पोटनिवडणूक टळणार, पुणे आणि चंद्रपूरमध्ये नियमाला अपवाद
अकोला पश्चिम मतदारसंघात सर्वधर्मीय मतदारांची संख्या मोठी आहे. आमदार गोवर्धन शर्मा यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांना मुस्लिमदेखील मतदान करीत होते. गोवर्धन शर्मा यांचे उत्तराधिकारी म्हणून भाजप कुणाला संधी देते, यावर देखील बरेच गणित अवलंबून राहील. भाजप नेतृत्व शर्मा कुटुंबात उमेदवारी देणार की इतरांना संधी दिली जाईल, हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अकोला पश्चिममधून लढण्यासाठी भाजपमध्ये अनेक नेते इच्छूक आहेत. गोवर्धन शर्मा यांच्या उंचीचा नेता आता भाजपला मिळणे अत्यंत अवघड असून प्राबल्य राखण्यात भाजपची चांगलीच दमछाक होणार असल्याचे चित्र आहे.