२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधक ‘इंडिया’ आघाडीच्या रुपात एकत्र आले आहेत. या आघाडीत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सीपीआय (एम), राष्ट्रवादी, शिवसेना (उबाठा) अशा महत्त्वाच्या पक्षांचा समावेश आहे. या आघाडीची मुंबईत नुकतीच तिसरी बैठक झाली. या बैठकीत वेगवेगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. दरम्यान, या बैठकीनंतर तृणमूल काँग्रेसचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि सीपीआय (एम) या पक्षांवर टीका करणे टाळले आहे. त्याऐवजी अभिषेक यांनी भाजपा, नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

काँग्रेस, सीपीआय (एम) पक्षावर टीका करण्याचे टाळले

पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. येथे काँग्रेस आणि सीपीआय (एम) हे प्रमुख विरोधी पक्ष आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस, सीपीआय (एम) या पक्षांचे नेते एकमेकांवर कठोर शब्दांत टीका करत असतात. सध्या पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडी जिल्ह्यातील धुपगुडी मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, अभिषेक बॅनर्जी यांनी सभेला संबोधित करताना काँग्रेस आणि सीपीआय (एम) यांच्यावर टीका करण्याचे टाळले. त्यांनी एकूण अर्धा तास भाषण केले. या संपूर्ण भाषणात त्यांनी काँग्रेस किंवा सीपीआय (एम) चा साधा उल्लेखही केला नाही. त्याउलट त्यांनी मोदी आणि भाजपावर टीका केली. विरोधकांची इंडिया ही आघाडी भविष्यात मोदी यांचा निश्चितच पराभव करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

“भाजपाचे रक्षाबंधन दर पाच वर्षांनी”

केंद्र सरकारने नुकतेच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात २०० रुपयांची कपात केली आहे. हाच मुद्दा घेऊन त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. “सध्या भाजपाचा सगळीकडेच पराभव होत आहे. आगामी सर्वच निवडणुकांत भाजपाचा पराभव होणार आहे, हे लक्षात आल्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा दर २०० रुपयांनी कमी करण्यात आला. आम्ही देशातील महिलांना रक्षाबंधनानिमित्त ही भेट दिली आहे, असा दावा केंद्र सरकारने केला. मात्र, प्रत्येक पाच वर्षांनीच तुमचे रक्षाबंधन असते, उर्वरित काळात रक्षाबंधन नसते का?” अशी टीका अभिषेक बॅनर्जी यांनी केली.

आघाडीची सत्ता आल्यास गॅस सिलेंडर ४०० रुपयांना

“तुम्हाला आठवत आहे का, पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पाच रुपयांची कपात करण्यात आली होती. २०२४ सालच्या निवडणुकीत भाजपाचा विजय झाल्यास भविष्यात गॅस सिलेंडरची किंमत ही तीन हजार रुपये होईल. विरोधकांच्या इंडिया या आघाडीचा विजय झाल्यास गॅस फक्त ४०० रुपयांना मिळेल,” असेही बॅनर्जी म्हणाले.

अभिषेक बॅनर्जी यांचे जनतेला आश्वासन

आपल्या भाषणात अभिषेक बॅनर्जी यांनी धुपगुडी येथील स्थानिक प्रश्नांवरही भाष्य केले. लवकरच हा प्रदेश उपविभाग म्हणून घोषित केला जाईल. तसेच धुपगुडी मतदारसंघातील शासकीय रुग्णालय अद्ययावत केले जाईल. या रुग्णालयात सर्व आधुनिक उपकरणं लावली जातील, असे आश्वासनही अभिषेक बॅनर्जी यांनी दिले.

“ममता बॅनर्जी लोकांचे शोषण करत आहेत”

अभिषेक बॅनर्जी यांनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि सीपीआय (एम) पक्षावर टीका केलेली नसली, तरी या दोन्ही पक्षांनी मात्र तृणमूल काँग्रेसला लक्ष्य केले. धुपगुडी येथे एका संयुक्त सभेला संबोधित करताना काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी आणि सीपीआय (एम)चे नेते मोहम्मद सलीम यांनी तृणमूल काँग्रस लोकांचे शोषण करत आहे, असा आरोप केला.

“ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेही जनतेचे शोषण करत आहेत. पश्चिम बंगालमधील लोक हे सर्व पाहात आहेत. भविष्यात तेच योग्य निर्णय घेतील,” असे अधीर रंजन चौधरी म्हणाले.

धुपगुडी येथे तिरंगी लढत

दरम्यान, भाजपाचे आमदार विष्णू पादा रे यांचे २५ जुलै रोजी निधन झाले होते. त्यामुळे धुपगुडी मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. येथे तिरंगी लढत होतेय. काँग्रेसने सीपीआय (एम) पक्षाचे उमेदवार चंद्रा रॉय यांना पाठिंबा दिला; तर तृणमूल काँग्रेसने व्यवसायाने प्राध्यापक असलेल्या निर्मल चंद्रा रॉय यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने तपासी रॉय या शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानाच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे.

Story img Loader