काँग्रेस पक्षासोबत २०१९ नंतर सतत पंगा घेणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा सूर कर्नाटकच्या निकालानंतर काही प्रमाणात बदलला आहे. सोमवारी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे, त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी तयार आहोत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन दिवस झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांची ही प्रतिक्रिया आली आहे. या वेळी त्या म्हणाल्या की, आम्ही काँग्रेसला नक्कीच पाठिंबा देऊ, पण त्यांनी बंगालमध्ये आमच्यासोबत जी रोजची लढाई सुरू केली आहे ती पहिल्यांदा थांबवावी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही दिवसांपासून भाजपाविरोधी आघाडीसाठी जोरदार प्रयत्न सुरू असले तरी विरोधी आघाडीचे नेतृत्व कोण करणार? यावरून सर्वच पक्षांमध्ये प्रश्नचिन्ह आहे. त्याच वेळी प्रादेशिक पक्षांकडून अशी मागणी पुढे येत आहे की, काँग्रेसची ज्या ठिकाणी ताकद आहे, त्याच ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवावी. बाकीच्या जागा प्रादेशिक पक्षांवर सोडाव्यात.

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार संघर्ष गेल्या काही काळात झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसशी आघाडी करावी का, असा मोठा प्रश्न तृणमूल पक्षासमोर आहे. संसदेच्या अधिवेशनातदेखील हे चित्र वारंवार दिसले आहे. काँग्रेसकडून जे मुद्दे उपस्थित केले जातात, त्यापासून अंतर राखण्याची भूमिका तृणमूलकडून घेतली जाते. तसेच मागच्या अधिवेशनात विरोधकांच्या बैठकांनाही तृणमूलचे प्रतिनिधी हजेरी लावत नसल्याचे दिसून आले. अदाणी प्रकरणातही काँग्रेस आणि तृणमूलने वेगवेगळी भूमिका घेतली.

ममता बॅनर्जी सोमवारी म्हणाल्या, “ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस बलवान आहे, त्या २०० जागा किंवा त्यापेक्षा अधिकच्या जागा असतील. त्यांना तिथे लढू दिले पाहिजे. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, त्यात काहीच चुकीचे नाही. पण त्यांनी इतर राजकीय पक्षांनाही पाठिंबा दिला पाहिजे. मी तुम्हाला कर्नाटकात पाठिंबा दिला आणि तुम्ही पश्चिम बंगालमध्ये रोज माझ्याशी भांडण कराल, हे काही शक्य होणार नाही, असे उदाहरण म्हणून त्यांनी दिले. जर तुम्हाला चांगल्या गोष्टींची अपेक्षा असेल तर तुम्हालाही काही गोष्टींबद्दल कुठे ना कुठे तरी तडजोड करावीच लागेल.”

विरोधी पक्षांच्या जागावाटपाच्या मुद्द्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, वाटाघाटीची अंतिम चर्चा अजून व्हायची आहे. जेव्हा त्याची चर्चा होईल, तेव्हा आम्ही नक्कीच या विषयावर बोलू.

कर्नाटक निवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना ममता बॅनर्जी यांनी कर्नाटकच्या लोकांना सलाम केला आणि भाजपावर जोरदार टीका केली. मात्र त्यांनी काँग्रेसचा थेट उल्लेख करणे टाळले. “मला विश्वास आहे की, अहंकार, भेदभाव करणे, यंत्रणांच्या गैरवापराचे राजकारण आणि भाजपाचा सामान्य माणसावरील अत्याचार याची परिसीमा कर्नाटकच्या निकालात दिसली. मी कर्नाटकातील जनतेला सलाम करते की, त्यांनी भाजपाच्या अन्यायकारक व्यवस्थेविरोधात मतदान केले. आगामी काळात छत्तीसगढ, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये निवडणुका लागणार आहेत. मला खात्री आहे की, या राज्यांमध्येही भाजपाचा पराभव होईल.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After karnataka assembly result hint of a shift from mamata banerjeeready to support congress where it is strong kvg