कर्नाटकमधील विजयामुळे काँग्रेस पक्षाला एक नवी संजीवनी मिळाली आहे. २०२४ च्या लोकसभांची तयारी करण्यासाठी काँग्रेसला या विजयाचा मोठा लाभ होणार आहे. त्यातच आता इतर राज्यातही पक्षसंघटन बळकट करून त्या त्या राज्यातील पक्षाची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाणार आहे. कर्नाटकच्या शेजारी असणाऱ्या तेलंगणा राज्यात भारत राष्ट्र समिती पक्षाची सत्ता आहे. भाजपा हा तेलंगणात आपला जनाधार वाढविण्याचा प्रयत्न गेल्या काही काळापासून करीत आहे. आता बीआरएसला भाजपासोबतच काँग्रेसचाही सामना करावा लागणार आहे. बीआरएसचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ऊर्फ केसीआर यांनी पक्षाच्या खासदार, आमदार आणि विधान परिषदेच्या आमदारांची एक बैठक पक्ष मुख्यालयात घेतली. या वेळी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या धोक्याची सूचना आमदारांना देत सांगितले की, आपापल्या मतदारसंघात गाफिल न राहता मेहनत घेऊन काम करा. कर्नाटक विजयामुळे काँग्रेसला कमी लेखून चालणार नाही. तसेच काँग्रेस पक्षाच्या सत्तेच्या काळात देशाचा विकास खुंटला, असाही आरोप केसीआर यांनी या बैठकीत केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री केसीआर यांची प्रतिक्रिया ही तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जल्लोषानंतर आली आहे. १३ मे रोजी कर्नाटकमध्ये मोठा विजय प्राप्त झाल्यानंतर तेलंगणा काँग्रेसमधील नेत्यांनी सांगितले की, आता तेलंगणातदेखील पक्ष मोठा विजय मिळवील. तेलंगणाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ए. रेवंथ रेड्डी म्हणाले, “कर्नाटकाने भाजपाच्या राजकारणाला नाकारले आहे. त्यांनी विकासाला म्हणजेच काँग्रेसला मत दिले. कर्नाटक आता देशभरात विजय मिळवील. पुढचा विजय तेलंगणाचा असेल.”

हे वाचा >> चंद्रशेखर राव यांना मराठवाड्याचे एवढे आकर्षण का?

ज्येष्ठ नेत्यांना निवडणुकीत डावलणार नसल्याचा दिला शब्द

बीआरएसचे नेते बुधवारी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी निवडणूक जवळ आल्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसला निवडणुकीत हलक्यात घेतले जाणार नाही. बीआरएसचे अध्यक्ष विद्यमान आमदारांना तिकीट नाकारण्याच्या योजनेचा पुनर्विचार करणार आहेत. कारण भाजपाने कर्नाटकमध्ये हीच नीती अवलंबली होती, ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारल्यानंतर तो निर्णय भाजपाच्या अंगलट आला. बुधवारी बोलत असताना केसीआर यांनी सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र मुख्यमंत्री केसीआर त्यांच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवणार असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी पक्षाचे ज्येष्ठ खासदार आणि आमदार यांच्याशी वैयक्तिकरीत्या काँग्रेसच्या तेलंगणातील विजयाबद्दल चर्चा केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री केसीआर यांना मात्र पक्षाच्या कामगिरीवर आत्मविश्वास आहे. पक्षाने २०१४ पासून विकासात्मक काम केले आहे. त्यामुळे लोक काँग्रेसच्या आश्वासनावर विश्वास ठेवणार नाहीत, असे त्यांना वाटते. तसेच बीआरएस पक्ष या वेळी विजयाची हॅट्रिक मिळवतील. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बीआरएस पक्षाला ९५ ते १०५ जागा मिळतील, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.

बुधवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री केसीआर म्हणाले, “राज्यात झालेल्या सर्व्हेनुसार बीआरएस पक्षाला सलग तिसऱ्यांदा विजय मिळणार आहे. पण सर्वांनी अतिशय कठोर परिश्रम घेणे आवश्यक आहे. सर्वांनी आपापल्या मतदारसंघात अधिक वेळ घालवणे गरजेचे आहे. ही वेळ कार्यवाही करण्याची आहे. तुम्ही आपापल्या मतदारसंघात जा, कार्यकर्त्यांना एकत्र करा, स्थानिक नेत्यांशी बोला आणि कामाला सुरुवात करा. २१ दिवस आपल्या मतदारसंघात घालविण्याचा प्रयत्न करा. लोकांशी संवाद साधा आणि बीआरएसच्या सत्तेच्या काळात राज्याने काय साध्य केले, याची माहिती लोकांना द्या.”

हे वाचा >> चर्चेतील चेहरा, के. चंद्रशेखर राव यांची राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार का?

तेलंगणा मॉडेलचा प्रचार करा

तसेच तेलंगणा राज्याच्या स्थापनेला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल २१ दिवसांचा जल्लोष साजरा केला जाणार आहे. २ जूनपासून या जल्लोषाची सुरुवात होणार आहे. या २१ दिवसांत राज्याने मागच्या ९ वर्षांत केलेली चांगली कामे लोकांमध्ये जाऊन सांगा, असे आवाहन करून मुख्यमंत्री केसीआर यांनी बीआरएसच्या सत्ताकाळात राज्यात सर्वच क्षेत्राचा मोठा विकास झाला असल्याचा दावा केला. या वेळी केसीआर यांनी गुजरात मॉडेलवर टीका केली. तसेच यापुढे विकासाचे उदाहरण देण्यासाठी तेलंगणा मॉडेल ऑफ डेव्हलपमेंटचे उदाहरण द्या, असे आवाहन केले. तेलंगणा मॉडेलची चर्चा आता अनेक राज्यांमध्ये होऊ लागली आहे. आपल्या राज्यातील योजना इतर राज्य स्वीकारत आहेत. जात, धर्म असा कोणताही भेदभाव न करता आपण सर्वांना विकासाच्या संधी दिल्या आहेत. त्यामुळेच नऊ वर्षे लोक आपल्यासोबत आहेत, असेही मुख्यमंत्री केसीआर म्हणाले.