अकोला : मध्य नागपूरनंतर अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडीवर मोठा राजकीय डाव टाकला. काँग्रेसमधून आलेले वंचितचे अकोला पश्चिममधील अधिकृत उमेदवार डॉ. झिशान हुसेन यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे अकोला पश्चिममध्ये पक्षाचा अधिकृत उमेदवारच नसल्याची नामुष्की वंचितवर ओढवली आहे. मतविभाजन टाळण्यासाठी काँग्रेसने टाकलेल्या राजकीय डावात वंचित आघाडी अडकली. आता त्याला वंचित आघाडी काय प्रत्युत्तर देते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीसाठी अत्यंत वेगाने राजकीय घडामोडी सुरू आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज अकोला पश्चिम मतदारसंघातून अधिकृत उमेदवार डॉ. झिशान हुसेन यांनी माघार घेऊन वंचितला मोठा धक्का दिला. या मतदारसंघात काँग्रेसने साजिद खान पठाण यांच्यावरच विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली. २०१९ मध्ये त्यांनी भाजपला कडवी झुंज दिली होती. त्यांची उमेदवारी जाहीर होताच अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे माजी मंत्री अजहर हुसेन यांचे पुत्र तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. झिशान हुसेन यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडून निवडणूक लढण्यासाठी ‘वंचित’ची वाट निवडली होती. वंचित आघाडीने डॉ. हुसेन यांना उमेदवारी देखील दिल्याने त्यांनी पक्षाच्या एबी फॉर्मवर अर्ज दाखल केला. मतविभाजन होऊन त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता होती. वंचितचे अधिकृत उमेदवार असतांनाही डॉ. हुसेन यांनी निवडणुकीतून आज माघार घेतली. वंचितसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता अकोला पश्चिममध्ये पक्षाचा उमेदवार नाही. पक्षासोबत काँग्रेसने दगाफटका केल्याचा आरोप वंचित आघाडीकडून होत आहे.

आणखी वाचा-प्रमुख बंडखोरांमुळे महायुती व मविआची वाट बिकट

वंचितचे अकोला जिल्हा हे प्रभाव क्षेत्र आहे. अकोला पश्चिममध्ये वंचितची दखलपात्र मतपेढी असतांना त्याठिकाणी वंचितच्या उमेदवाराने माघार घेतली. वंचितचे उमेदवार म्हणून डॉ. हुसेन निवडणूक रिंगणात कायम राहिले असते तर त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसला असता. यापूर्वी मध्य नागपूरमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तसेच माजी मंत्री अनिस अहमद यांनी वंचितमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली. मात्र, कार्यालयात पोहोचण्यात विलंब झाल्याचे कारण पुढे करून त्यांनी अर्ज भरला नाही. त्यानंतर लगेच अनिस अहमद यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केली. मतविभाजन टाळण्यासाठी नागपूर मध्यनंतर अकोला पश्चिममध्ये काँग्रेसने मोठा राजकीय डाव टाकल्याचे बोलल्या जात आहे. काँग्रेसने राजकीय खेळीत वंचितला कोंडीत पकडल्याचे चित्र आहे.

आणखी वाचा-वणी, उमरखेडमध्ये महाविकास आघाडीची चिंता वाढली, दोन ठिकाणी चौरंगी तर पाच मतदारसंघात थेट लढत

वंचितची भूमिका काय राहणार?

अकोला पश्चिम मतदारसंघात वंचितचा अधिकृत उमेदवार नाही. त्यामुळे आता इतर कुठल्या उमेदवाराला पाठिंबा देणे किंवा तटस्थ राहण्याशिवाय वंचितपुढे पर्याय दिसत नाही. काँग्रेसचा वचपा काढण्याचे वंचितचे प्रयत्न राहतील. त्यामुळे वंचित एखाद्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

काँग्रेसने दगा दिला

आरक्षण, संविधान वाचवण्यासाठी लढा देणाऱ्या वंचित आघाडीसोबत काँग्रेसने दगाफटका केला. यावरून काँग्रेस व भाजपची फोडाफोडीची एकच मानसिकता असल्याचे सिद्ध होते. अकोला पश्चिममध्ये पक्ष योग्य निर्णय घेईल. -डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष, वंचित आघाडी.

व्यक्तिगत कारणांमुळे माघार

ॲड. प्रकाश आंबेडकर, प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची माफी मागून वैयक्तिक कारणामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेसकडूनही उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव होता. -डॉ. झिशान हुसेन, अकोला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After madhya nagpur candidate of vanchit bahujan aghadi dr zheeshan hussain withdrawal from akola west constituency maharashtra assembly election 2024 print politics news mrj