परभणी : महायुतीतून बाहेर पडून राज्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी घेतल्यानंतर गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. रासपचे गंगाखेडचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या भूमिकेकडेही या निमित्ताने लक्ष लागले आहे. रासपचा अडसर दूर झाल्याने आता गंगाखेडची जागा महायुतीत भाजप लढण्याचा मार्ग मोकळा झाल्याच्या प्रतिक्रियाही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वर्तुळातून व्यक्त होत आहेत.

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीवर आपला राग नाही. तथापि पक्षाच्या वाढीसाठी स्वतंत्रपणे राज्यात सर्व जागांवर उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले. परभणी जिल्ह्यात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाकडे गंगाखेड विधानसभेची जागा असून या ठिकाणी रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच उघड भूमिका घेतली आहे. दोन महिन्यापूर्वीच भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसह अन्य काही नेत्यांना भेटले. गंगाखेडची जागा रासपच्या तावडीतून सोडवून घेऊन भाजपने लढवावी. जर आमच्या भावना पक्ष नेतृत्वाने समजून घेतल्या नाहीत तर आम्हाला पक्षकार्यातून मोकळे करा असे म्हणत येणाऱ्या निवडणुकीत आमदार गुट्टे यांचे काम आम्ही करणार नाही अशी भूमिका त्यावेळी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वासमोर जाहीरपणे मांडली. त्यापैकी काहींनी आता स्वतंत्र राजकीय पर्यायाचा विचारही सुरू केला आहे.

हेही वाचा – मराठवाड्यात राष्ट्रवादीत फूट पडलेल्या मतदारसंघांमध्ये चुरस

गंगाखेड विधानसभा मतदारसंघ हा पूर्वापार भाजपच्या वाट्याचा आहे. तो पुन्हा भाजपकडेच यावा अशी भावना या भागातल्या काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. भाजपकडे सक्षम उमेदवार असताना आणि या मतदारसंघातील जातीय गणिते भाजपाला अनुकूल असताना या मतदारसंघावरचा आपला हक्क पक्षाने सोडू नये अशी भूमिका विठ्ठलराव रबदडे, रामप्रभू मुंढे, व्यंकटराव तांदळे, श्रीराम मुंडे आदी पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच घेतली आहे. त्यापैकी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रबदडे यांनी वेगळ्या राजकीय पर्यायांची चाचपणी सुरू केली. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे आणि आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यातील मतभेद यापूर्वी अनेकदा उघड झाले आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष मुरकुटे हे भाजपच्या गोटातील प्रबळ दावेदार मानले जातात. एका कार्यक्रमात रावसाहेब दानवे आणि भागवत कराड या पक्षाच्या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी मुरकुटे यांना ‘कामाला लागा’ असेही निर्देश दिले होते. मात्र महायुतीतील घटक पक्ष म्हणून गुट्टे यांनाच भाजपच्या नेतृत्वानेही बळ पुरवले होते. आता रासपणे स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर ‘सुंठे वाचून खोकला गेला’ अशी प्रतिक्रिया भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमधून उमटली आहे.

हेही वाचा – अपक्ष आमदार किशोर जोरगेवार तुतारी फुंकणार? पवार गटाकडून चंद्रपुरातून निवडणूक लढण्याचे संकेत

आमदार गुट्टे यांनी गेल्या पाच वर्षांत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे मतदारसंघात कायमच खच्चीकरण केले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा कोणताच फायदा झाला नाही. उलट भाजप कार्यकर्त्यांची सातत्याने त्यांनी कोंडी केली. ‘रासप’ने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर गुट्टे महायुतीच्या बाहेर पडणार असतील तर आनंदच आहे. या मतदारसंघात भाजपचा मोठा जनाधार आहे. या मतदारसंघातून लढण्याचा आदेश भाजपच्या नेतृत्वाने दिला तर त्या आदेशाचे पालनच केले जाईल. – संतोष मुरकुटे, जिल्हाध्यक्ष, भाजप (परभणी ग्रामीण)