ईशान्य भारतातील राजकीय पक्षांनी गुरूवारी (दि. २० जुलै) मणिपूरमधील दोन आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराचा कठोर शब्दात निषेध व्यक्त केला. यामध्ये एनडीएतील काही घटक पक्षांचाही समावेश आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या पक्षातील नेत्यांनी केली. मिझो नॅशनल फ्रंटचे नेते आणि मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथंगा भाजपाच्या मित्रपक्षापैकी एक आहेत. त्यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओला पाशवी, निर्दयी, भयंकर, घृणास्पद आणि अमानवी असल्याचे सांगितले. तरी काही नेत्यांनी मणिपूरमधील भाजपाचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
झोरमथंगा पुढे म्हणाले, “मणिपूरमध्ये सध्या जो संघर्ष सुरू आहे, त्यावरून संपूर्ण ईशान्य भारतासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. जे फक्त केंद्र सरकारच्या माध्यमातूनच होऊ शकते. मी पुन्हा सांगतो, या संघर्षामुळे अनेक लोकांना प्राण गमवावे लागले, सगळीकडे रक्तपात दिसतोय, शारीरिक छळ आणि पीडितांना मिळेत त्या निवारा केंद्रात आश्रय घ्यावा लागत आहे. मणिपूरमधील पीडित लोक हे माझे सगेसोयरे आणि रक्ताचे नातेवाईक आहेत, यात कोणतीही शंका नाही. त्यांचे रक्त सांडत असताना आम्ही फक्त मौन बाळगून शांत बसलो तर कसे चालेल? शांत राहणे हा पर्याय असू शकतो असे मला बिलकूल वाटत नाही!”
हे वाचा >> Manipur Violence : मणिपूरमध्ये महिलांची निर्वस्त्र धिंड; संपूर्ण प्रकरण काय आहे?
मणिपूरमध्ये ज्या दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढली आणि जमावाने त्यांच्यावर अत्याचार केला त्या महिला कुकी-झोमी या आदिवासी जमातीतून येतात. मिझोराममधील मिझोस या जमातीसोबत त्यांचे वांशिक संबंध आहेत.
मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांची नॅशनल पिपल्स पार्टी (NPP) एनडीएचा घटकपक्ष आहे. त्यांनी म्हटले की, मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेमुळे मी अत्यंत अस्वस्थ झालो आहे. कोणत्याही व्यक्तिची प्रतिष्ठा हिरावून घेणे, हे सर्वात निंदनीय आणि अमानवी कृत्य आहे, असे मी समजतो. मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. जे कुणी दोषी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहीजे, अशी मागणी त्यांनी केली.
नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो हे नॅशनॅलिस्ट डेमोक्रॅटिक पिपल्स पार्टीचे नेते असून त्यांचा पक्षही एनडीएचा घटकपक्ष आहे. त्यांनी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संपर्क साधून तातडीने कडक कारवाई करण्याची आणि मणिपूरच्या जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली. “मणिपूरमधील घटना रानटी आणि लाजिरवाणी आहे. या घृणास्पद घटनेचा जेवढ्या तीव्र शब्दात निषेध करावा, तेवढा कमीच आहे. रानटी जमावाच्या जुलूमशाहीला सभ्य समाजात कोणतेही स्थान देता कामा नये. मणिपूरमध्ये मागच्या दोन महिन्यांपासून ज्या काही घटना घडत आहेत, त्या पाहून आम्हाला अतीव वेदना होत आहेत.”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हे ही वाचा >> मणिपूर पेटले असताना त्याची राज्यसभेत चर्चा का झाली नाही? कोणत्या नियमांवरून चर्चा अडली?
भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या नॅशनल पिपल्स फ्रंटचे नेते आणि मणिपूर बाह्य मतदारसंघाचे खासदार लोरहो पफोजे म्हणाले, “राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा ढासळली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी याची जबाबदारी स्वीकारायला हवी. त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा किंवा त्यांची हकालपट्टी तरी झाली पाहीजे.”
त्रिपुरामधील टिपरा मोथा पक्षाचे नेते प्रद्योद देबबर्मा म्हणाले, “मला मणिपूरमधील प्रकारावरून किळस वाटत आहे. ईशान्य भारत वगळता भारताच्या इतर राज्यांमध्ये जेव्हा जेव्हा महिलांवर अत्याचाराची प्रकरणे घडली तेव्हा तेव्हा आम्ही अत्याचाराच्या विरोधात उभे राहिलो. आम्ही नेहमी म्हणायचो की भारतातील इतर राज्यात जसा अन्याय होतो, तसा ईशान्य भारतात होत नाही. पण आमच्याच अंगणात असा घृणास्पद प्रकार घडल्यामुळे माझी मान शरमेने खाली गेली आहे.”
मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या एका प्रतिक्रियेवर टीका करताना प्रद्योद देबबर्मा म्हणाले “मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणतात सदर व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला. पण तुम्ही गृहमंत्रीदेखील आहात. मला पूर्ण कल्पना आहे की, या घटनेची माहिती उच्च स्तरावर आधापासूनच होती.”
आणखी वाचा >> स्वातंत्र्यानंतरचे सर्वात भयावह हत्याकांड; मणिपूर दौऱ्यानंतर तृणमूल काँग्रेसची टीका
आसाम महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा मीरा बोरठाकूर म्हणाल्या, “महिलांवर अत्याचार झालेली घटना ७४ दिवस उलटून गेल्यानंतर जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा समोर आली. तोपर्यंत राज्य सरकार या घटनेतील आरोपींना वाचवून सदर घटनेवर पडदा टाकण्याचेच काम करत होते. मणिपूर सरकारला आता सत्तेवर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा हे ईशान्य भारत डेमोक्रॅटिक आघाडीचे संयोजक आहेत. मणिपूरमधील हिंसाचार नियंत्रणात का येत नाही? याबद्दलचे कोणतेही उत्तर त्यांच्याकडे नाही.”