चंद्रशेखर बोबडे
नागपूर: विरोधी पक्ष एकजुटीने लढला तर बालेकिल्ल्यातही भाजपला धुळ चारणे सहज शक्य आहे, हे नागपूर पदवीधर पाठोपाठ शिक्षक मतदारसंघातील भाजपच्या दारुन पराभवाने सिद्ध केले आहे. नागपूरमधील हा दुसरा पराभव भाजपच्या जिव्हारी लागणारा असून बारामतीत कमळ फुलवण्याची भाषा करणाऱ्या प्रदेशाध्यक्षांवर जिल्ह्यातच नामुष्की ओढवली आहे.
नागपूर शिक्षक मतदारसंघातील लढत भाजप समर्थित विद्यमान आमदार नागोराव गाणार, काँग्रेस समर्थित माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले व शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यात होती. गाणार हे सलग दोन वेळा निवडून आले होते तर राजेंद्र झाडे २०१७ च्या निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे उमेदवार होते. फक्त अडबाले यांच्या रुपात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने नवीन चेहरा दिला होता. निवडणूक प्रचार काळात ही लढत चुरशीची होईल,असा अंदाज बांधण्यात आला होता. भाजपचे नियोजन हे शहरी मतदार, भाजप आणि शिक्षक परिषदेचे संघटनात्म पाठबळ यावर आधारित होते. अडबाले यांनी दोन वर्षापूर्वीपासून प्रचाराला सुरूवात करत संघात एकजूट निर्माण केली. जुन्या पेन्शनचा मुद्दा लावून धरला. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांची भीस्त असंतुष्ट काँग्रेसजण आणि मतदार नोंदणीवर होती.
हेही वाचा… सत्यजित तांबे यांच्या भविष्यातील भूमिकेविषयी उत्सुकता
निवडणूक निकालातून जे चित्र पुढे आले ते वरील सर्व समीकरणांना छेद देणारे ठरले. अपेक्षे प्रमाणे् गाणार यांना अपेक्षे प्रमाणे शहरातील मते मिळाली नाहीत, झाडे यांना मागच्या निवडणुकीच्या तुलनेत दोन हजार मते कमी पडली तर अडबाले यांना पहिल्या फेरीतच एकूण मतदानाच्या ५५ टक्के मते मिळाली. यावरून ही निवडणूक चुरशीची नव्हे तर एकतर्फी झाली हे स्पष्ट होते.
हेही वाचा… कोकणात भाजपची रणनीती फळाला
गाणार यांच्या पराभवाचे विश्लेषण महत्वाचे ठरते. कारण त्यांचा व्यक्तीगत पराभव नाही तर भाजपसारखा सर्वच बाजूने बलाढ्य असणारा पक्ष त्यांच्यासोबत असल्याने त्याचाही पराभव ठरतो. गाणार यांच्या पराभवामागे प्रमुख तीन कारणे सांगितली जातात. गाणार निष्क्रिय होते, त्यांच्या कार्यशैलीमुळे संघ आणि भाजप वर्तुळातील शिक्षण संस्थाचालक नाराज होते आणि तिसरी प्रमुख बाब म्हणजे जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा. मात्र या तीन प्रमुख कारणांसह भाजपमधील अंतर्गत गटबाजी हे चौथे प्रमुख कारण गाणार यांच्या पराभवामागेआहे ते दडवण्यासाठी गाणार यांची निष्क्रियता हे कारण दिले जात आहे. आता तर गाणार हे भाजपचे उमेदवारच नव्हते असा अजब दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. यातून त्यांचा पाठिंबा गाणार यांना नव्हता असा दुसरा अर्थ निघतो. भाजपची संघटनात्मक फळी मजबूत असती तर गाणार यांना ८ हजार इतकी कमी मते मिळाली नसती. २०१७ च्या निवडणुकीत गाणार यांना पहिल्या पसंतीची १० हजार मते होती.
हेही वाचा… औरंगाबादमध्ये विक्रम काळे यांचे सलग चौथे यश अवघड का बनले ?
अडबाले यांनी पहिल्याच फेरीत घेतलेली १६ हजारावर मतेही महत्वाची आहेत.. केवळ महाविकास आघाडीच्या समर्थनाने ही मते मिळू शकली नाही तर त्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाटनेची भूमिका महत्वाची ठरली. त्याला महाविकास आघाडीची भक्कम साथ मिळाल्याने ही निवडणूक एकतर्फी झाली. नेहमीच गटबाजीचा आरोप होणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी एकजुटीने यांच्यासाठी प्रयत्न केले. विशेषता काँग्रेस नेते उभे राहिले. आमदार अभिजित वंजारी, माजी मंत्री सुनील केदार, विजय वडेट्टीवर , बबनराव तायवाडे या सर्व नेत्यांनी एकत्रितपणे केलेले प्रयत्नन व त्याला माध्यमिक शिक्षक संघाच्या संघटनात्मक बळ लाभले त्यांनी अडबाले पहिल्याच फेरीत १६ हजारावर प्रथम पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण करून विजयी होऊ शकले. अडबाले यांच्या निमित्ताने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने पुन्हा यामतदारसंघात बारा वर्षाने पुनरागमन केले आहे.
दरम्यान नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला आहे असे चित्र भाजपने मागील दीड दशकात निवडणुकांच्या माध्यमातून निर्माण केले. सर्व पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली तर बालेकिल्ल्यातही भाजपला धुळ चारणे शक्य आहे हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. त्यामुळे एक वर्षाने होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर विधान परिषदेचा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा वाजवणार आहे.
“ जुन्या पेन्शन योजनेच्या फडणवीस यांच्या भूमिकेचा फटका या निवडणुकीत बसला, यापुढेही शिक्षकांसाठी काम करीत राहू” – नागोराव गाणार ( शिक्षक परिषद उमेदवार)
“ मी शिक्षकाचा प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेत काम करणार, त्यात राजकारण येणार नाही, महाविकास आघाडीने मदत केली. त्यामुळे विजय सुकर झाला.” – सुधाकर अडबाले, विजयी उमेदवार, मविआ