बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (युनायटेड)चे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडत भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)बरोबर पुन्हा एकदा युती केली आहे. त्यामुळे बिहारमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सोमवारी बिहारमध्ये दाखल झाली असून, आज (मंगळवारी) पूर्णिया येथे मोठी सभा होणार आहे. या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सीपीआय( एमएल) नेते दीपांकर भट्टाचार्य, तसेच आरजेडीचे काही प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिहारमध्ये काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीकडे शक्तिप्रदर्शन करण्याची संधी आहे.
या संदर्भात बोलताना बिहार काँग्रेसचे नेते अखिलेश सिंह म्हणाले, “पूर्णियातील ज्या मैदानात आमची सभा होणार आहे, त्या मैदानाची क्षमता दीड ते दोन लाख लोक बसू शकतील एवढी आहे; परंतु या ठिकाणी त्यापेक्षा जास्त लोक येण्याची शक्यता आहे. त्यानुसार आम्ही नियोजन केले आहे. आम्ही घरोघरी जाऊन लोकांना या सभेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यांना सभास्थळी पोहोचण्यासाठी वाहतुकीची व्यवस्थाही आम्ही करीत आहोत.”
हेही वाचा – राजस्थान ते तेलंगणा! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय निर्णय घेण्याची स्पर्धा; वाचा सविस्तर…
पूर्णियामध्ये होणाऱ्या सभेत आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव सहभागी होणार का? हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. या संदर्भात बोलताना सिंह म्हणाले, “माझी लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी या सभेत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, मंगळवारी त्यांना ईडी आणि सीबीआयने चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे वेळ मिळाल्यास त्यांनी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांना शक्य न झाल्यास आरजेडीचे काही नेते उपस्थित राहतील.”
दरम्यान, सोमवारी राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सकाळी ११ वाजता पश्चिम बंगालमधून बिहारच्या किशनगंज येथे दाखल झाली. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे अशफाउल्ला मैदानात सभा पार पडली. यावेळी बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी बिहार काँग्रेस अध्यक्ष अखिलेश सिंह यांना यात्रेचा ध्वज दिला. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. “मणिपूर जळत असून, तिथे लोक मारले जात आहेत. त्यांची घरे जाळण्यात येत आहेत. मात्र, आमचे पंतप्रधान अद्यापही मणिपूरला गेलेले नाहीत.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी देशभरात जातीआधारित जनगणना करण्याचीही मागणी केली. “सामाजिक न्याय काय असतो, हे बिहारपेक्षा चांगले कोणालाही माहीत नाही. देशाला सामाजिक न्याय करण्यासाठी जातीआधारित जनगणना करणे आवश्यक आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांच्या इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याच्या निर्णयावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी काँग्रेस नेत्यांनी नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, “नितीश कुमार यांच्या इंडिया आघाडीतून बाहेर पडण्यामुळे इंडिया आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, नितीश कुमारांनी अनेकदा जातीआधारित जनगणना करण्याची मागणी केली आहे. अशा वेळी भाजपा त्यांची मागणी पूर्ण करणार का? हे आम्हाला बघायचं आहे.”
हेही वाचा – नितीश कुमार यांच्या सतत पलटी मारण्यामागील नेमके राजकारण काय? आकडेवारी काय सांगते? वाचा सविस्तर..
“मुळात भारत जोडो यात्रेवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाकडून षडयंत्र रचले जात आहे. भारत जोडो न्याय यात्रा सुरू होण्याच्या दिवशी मिलिंद देवरा यांचे काँग्रेस सोडणे आणि आता बिहारमध्ये दाखल होण्यापूर्वी नितीश कुमार यांचे इंडिया आघाडीतून बाहेर पडणे, हा याच षडयंत्राचा भाग आहे. मात्र, याचा आमच्या यात्रेवर कोणताही परिणाम होणार नाही. नितीश कुमार पाठीत वार करण्यात तज्ज्ञ आहेत. ते सरड्यासारखा रंग बदलतात. हे संपूर्ण नाटक भाजपा, पंतप्रधान मोदी व अमित शहा यांनी रचले होते”, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.