रवींद्र जुनारकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस आघाडीने यश संपादन केले असले तरी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी ही निवडणूक धोक्याची घंटा ठरली आहे. दुसरीकडे, चंद्रपूर व राजुरा बाजार समितीतील काँग्रेस-भाजप युती आणि मूल बाजार समिती निवडणूक रिंगणातून भाजपने ऐनवेळी घेतलेली माघार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार व आमदार सुभाष धोटे कठीण समयी एकमेकांना सांभाळून घेतात, हे पुन्हा एकदा सिद्ध करणारी ठरली आहे.

अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांच्या गटाचा कृषी उत्पन्न बाजार समितीत धुव्वा उडाला. तसाच प्रकार चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर आणि त्यांची आमदार पत्नी प्रतीभा धानोरकर यांच्याबाबतीत घडला आहे.जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. यापैकी आठ बाजार समितीत काँग्रेस आघाडीने यश संपादन केले. दोन ठिकाणी भाजप, एका ठिकाणी भाजप-काँग्रेस युती तर एका ठिकाणी ठाकरे गटाला सर्वाधिक संचालक निवडून आणण्यात यश आले. बाजार समितीची निवडणूक ही पक्षीय चिन्हावर होत नसल्यामुळे स्थानिक पातळीवर नेते युती व आघाडी करतात. जिल्ह्यातदेखील चंद्रपूर व राजुरा या दोन बाजार समितीत काँग्रेस व भाजपची युती पहायला मिळाली. चंद्रपुरात काँग्रेस खासदार बाळू धानोरकर गटाला पराभूत करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार एकत्र आले. आजी-माजी पालकमंत्र्यांनी अनुक्रमे भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली. राजुरा बाजार समितीत तर शेतकरी संघटनेला रोखण्यासाठी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुभाष धोटे, माजी आमदार ॲड. संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर एकत्र आलेत. भद्रावती व वरोरा या खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या मतदारसंघातील बाजार समित्या.

हेही वाचा >>>लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर ब्रिजभूषण सिंह उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारातून बाहेर

मात्र, तिथे धानोरकर दाम्पत्याला विजयापासून रोखण्यासाठी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे असे सर्वच पक्षाचे स्थानिक नेते एकत्र आले. परिणामी भद्रावतीत ठाकरे गटाचे रवींद्र शिंदे यांनी यश संपादन केले, तर वरोरा येथे आघाडीला यश आले. ब्रम्हपुरी व सिंदेवाही या दोन ठिकाणी वडेट्टीवार यांनी स्वत:ची पकड अधिक मजबूत करीत भाजपला पराभूत केले. मात्र, चिमूर येथे कधीकाळी वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक राहिलेले संजय डोंगरे यांना आमदार बंटी भांगडिया यांनी सोबत घेतले व विजय मिळवला. नागभीड बाजार समितीतही आ. भांगडिया यांचा करिश्मा चालला. तिथे भाजपला यश मिळाले. गोंडपिंपरी हा आ. धोटे यांचा बालेकिल्ला. मात्र, तिथे भाजपने मुसंडी मारत विजय संपादन केला. कोरपना येथे काँग्रेस आघाडीने यश मिळवले, तर पोंभूर्णा येथे विद्यमान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वर्चस्व असताना काँग्रेसने यश संपादन केले.

हेही वाचा >>>मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या पक्षाला मद्य माफियाकडून दहा हजार कोटींचा मलिदा मिळाल्याचा भाजपाचा आरोप

एकंदरीत ही निवडणूक खऱ्या अर्थाने काँग्रेस खासदार धानोरकर व आ. प्रतिभा धानोरकर यांची जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड सैल होत असल्याचे संकेत देणारी ठरली आहे, तर वडेट्टीवार यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या माध्यमातून आपली पकड अधिक घट्ट केली आहे. पालकमंत्री मुनगंटीवार, आ. धोटे या दोन्ही प्रस्थापितांना ही निवडणूक भविष्यातील संभाव्य धोके दाखवणारी ठरली. आ. भांगडिया यांनी या निवडणुकीतून आपले वर्चस्व सिद्ध केले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका पाहता धानोरकर दाम्पत्याला वेळीच सावध होणे गरजेचे आहे. स्वपक्षातील गटबाजी आणि वडेट्टीवार यांच्यासोबत असलेले राजकीय वैर संपुष्टात आणून काँग्रेसला बळ देणे आणि त्यातून आपले राजकीय वर्चस्व कायम राखण्याचे मोठे आव्हान धानोरकर दाम्पत्यासमोर उभे ठाकले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After rana couple now alarm bell for dhanorkar couple in chandrapur print politics news amy