सुहास सरदेशमुख

बंडखोर’ आणि ‘गद्दार’ अशी बिरुदावली लावून मराठवाड्यातील नऊ मतदारसंघात निषेधाचे सूर उंचावल्यानंतर आता सत्तासोपान चढणाऱ्या आमदारांच्या मतदारसंघात शक्तिप्रदर्शन केले जात आहे. वैजापूर मतदारसंघात परतलेले प्रा. रमेश बोरनारे यांच्या भोवती कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली तर संदीपान भुमरे यांचे विमानतळावर जल्लोषात स्वागत झाले.

मराठवाड्यातील बंडखोरी करणाऱ्यांपैकी आक्रमक अशी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरलेले संजय शिरसाठ यांनी नवे आरोप केले नसले तरी आता सारे जण मंत्रीपदाचा आपला दावा कसा बरोबर याची चर्चा करत आहेत. अब्दुल सत्तार व संदीपान भुमरे यांनी मंत्रीपद मिळालेले असतानाही ‘उठावा’ त सहभाग नोंदविल्याचा दावा केला आहे. दरम्यान बंडखोर नेत्यांसाठी होणाऱ्या शक्ती प्रदर्शनातील कार्यकर्त्यांची संख्याही लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. मात्र, सेनेतील पदाधिकारी त्यांच्या समवेत नाहीत, हे चित्र मराठवाडाभर दिसत आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ, संदीपान भुमरे, प्रा. रमेश बोरनारे हे चार आमदार शिंदेगटात सहभागी झाले. यातील संजय शिरसाठ यांच्या मतदारसंघात भाजपचा वरचष्मा असल्याचे मानले जाते. विजय जरी सेना उमेदवार म्हणून आमदार संजय शिरसाठ यांचा झाला तरी प्रभाव भाजपाचा अशी स्थिती असल्याने शिरसाठ यांचा युतीसाठी हट्ट होता, असे सांगण्यात येते. संजय शिरसाठ हे मंत्री होतील असा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत. प्रदीप जैस्वाल तसेच अन्य बंडखोर आमदारांनी मंत्रीपदास देवेंद्र फडणवीस यांनाही गळ घालावी अशी विनंती हस्ते- परहस्ते केली होती, असे नुकतेच राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले होते. औरंगाबाद शहरात आमदार जैस्वाल पोचल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी जेसीबीला हार लावून त्यांचे स्वागत करण्यात आले.

बोरनारे यांनी वैजापूर मतदारसंघात परतल्यानंतर शक्तिप्रदर्शन घडवून आणले. मात्र, नऊ पैकी एकाही मतदारसंघात पदाधिकारी व कार्यकर्ते आमदारांसमवेत गेले नसल्याचा शिवसेनेचा दावा आहे. हिंगोलीचे जिल्हा प्रमुख पद मात्र आमदार संतोष बांगर यांच्याकडे असल्याने तेथे शिवसेनेला नव्या दमाचा कार्यकर्ता शोधवा लागणार आहे. नुकतेच संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी दौरा करून त्याची पाहणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख वगळून टीका करायची आणि सेनेतील आपल्या समर्थकांना बाजूने वळवायचे अशी रणनीती अवलंबल्याचे चित्र दिसून येत आहे.

Story img Loader