महेश सरलष्कर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यात झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गौरवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे अध्यक्ष शरद पवार दुसऱ्या दिवशी, बुधवारी दिल्लीत विरोधकांच्या बैठका व भेटीगाठींमध्ये सहभागी होऊ मोदीविरोधी डावपेचांत सक्रिय झालेले दिसले!

मणिपूरच्या चिघळत असलेल्या परिस्थितीवर तातडीने संसदेमध्ये निवेदन देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींना सूचना करावी, अशी विनंती करण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे अध्यक्ष व राज्यसभेतील खासदार या नात्याने शरद पवार यांचाही समावेश होता. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खरगेंनी राष्ट्रपती मुर्मूंशी संवाद साधला. त्यावेळी पवार खरगेंच्या आसनाशेजारी अग्रभागी बसले होते. विरोधकांचे शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेणार असल्याचे मंगळवारी जाहीर केले होते. शिष्टमंडळाने मुर्मूंना मोदींविरोधातील गाऱ्हाणे मांडणारे निवेदनही दिले.

हेही वाचा… धर्मातराच्या आरोपांवर नगर जिल्ह्यातील भाजप नेत्यांचे मौन, बाहेरील नेते अधिक सक्रिय

संसदेच्या अधिवेशनाचे दैनंदिन कामकाज सुरू होण्यापूर्वी संसद भवनामध्ये राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात झालेल्या विरोधी पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये शरद पवार सामील झाले होते. या बैठकीमध्ये विरोधकांची सभागृहांतील रणनिती निश्चित केली जाते. या बैठकीमध्ये पवार सलग दुसऱ्या आठवड्यात सामील झालेले पाहायला मिळाले.

हेही वाचा… विरोधकांच्या अविश्वास ठरावावर संसदेत ८ ऑगस्ट रोजी चर्चा

विरोधी नेत्यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेण्यापूर्वी खरगे, शरद पवार व काँग्रेसचे खासदार जयराम रमेश या तिघांनी एकत्रितपणे उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांची त्यांच्या दालनात जाऊन चर्चा केली. राज्यसभेत खरगेंना बोलू दिले जात नाही, असा आरोप करत विरोधी सदस्यांनी सभात्याग केला होता. विरोधक प्रश्नोत्तराच्या तासामध्येही सहभागी झाले नव्हते, या विरोधकांच्या कृतीवर धनखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राज्यसभेतही मोदींनी निवेदन देण्याची मागणी विरोधक करत असून नियम २६७ अंतर्गत दिलेली एकही नोटीस धनखड यांनी स्वीकारलेली नाही. सभागृहातील कोंडी कायम असल्याने खरगे व पवारांनी घेतलेल्या धनखडांच्या भेटीला महत्त्व दिले जात आहे.

हेही वाचा… के. चंद्रशेखर राव यांची कोल्हापूर, सांगलीत राजकीय मशागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने मंगळवारी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पुण्यातील या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये शरद पवारही होते. मोदींच्या गौरव समारंभाला हजेरी लावणार असल्याचे पवार यांनी आधीच स्पष्ट केले होते. असे असताना राष्ट्रीय राजकारणात मात्र पवार विरोधकांच्या रणनितीचाही भाग असल्याचा मुद्दा जाणीवपूर्वक अधोरेखित करत असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. विरोधी पक्षांची बैठक व राष्ट्रपतीभेटीची माहिती पवार यांनी ट्वीटद्वारे दिली तर, पवारांच्या भेटीबाबत उपराष्ट्रपती धनखड यांनी ट्वीट केले. पवारांच्या भूमिकेतील विसंगतीवर विरोधी पक्षांकडून कोणताही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After sharing stage with narendra modi in pune programme sharad pawar attended meeting of opposition parties print politics news asj