एजाज हुसेन मुजावर
सोलापूर : दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतरव देशमुख यांनी तब्बल सहा दशके मजबूतपणे सांभाळलेला सांगोल्यातील शेकापच्या गडाला त्यांच्या पश्चात पडझडीचा धोका निर्माण झाला आहे. शेकापच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेप्रणीत शिवसेनेचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनी स्वतःची ताकद वाढविण्याचा प्रयत्न चालविला असला तरी दुसरीकडे भाजपनेही सत्तेच्या जोरावर मजबूतपणे पाय रोवण्यास सुरूवात केली आहे. सध्याच्या राजकीय पक्षांच्या फाटाफुटीच्या काळात उरलासुरला शेकापही फुटण्याची चिन्हे सांगोला भागात दिसत असतानाच त्याचा लाभ उठविण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोघा मित्र पक्षांच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसून येते.
शेकापसारख्या एकाच पक्षाच्या तिकिटावर एकमेव सांगोला मतदारसंघातून तब्बल अकरावेळा म्हणजेच ५५ वर्षे विधानसभेवर प्रतिनिधित्व करण्याचा विक्रम नोंदविणारे गणपतराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे सांगोल्यात एकत्र आले होते. त्यावेळी यजमान शेकापपेक्षा भाजपनेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागताच्या नावाखाली शहरभर जागोजागी स्वागत कमानी, पक्षाचे झेंडे, उंच डिजिटल फलक उभारून स्वतःचे शक्तिप्रदर्शन घडवून आणले होते. कदाचित सांगोला भाजपमय करण्याचा हा प्रयत्न पाहून शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून खास शैलीत कोपरखळ्या मारल्या. शेकापचा बालेकिल्ला राहिलेल्या सांगोला तालुक्यात शेकाप किंवा क्वचितच काँग्रेस विचारांची असलेली वाट बदलण्याची सवय सांगोलेकरांना नाही. कोणी कितीही प्रयत्न केला तरीही ही वाट बदलली जाणे शक्य नाही, हे आपण देवेंद्र फडणवीस यांना मुद्दाम सांगू इच्छितो.
आणखी वाचा-अखेर मणिपूर विधानसभेच्या अधिवेशनाची घोषणा; कुकी समुदायच्या उपस्थितीवर मात्र प्रश्नचिन्ह
सांगोला तालुका माणदेशात गणला जातो. माणदेशी माणसे पारंपारिक दुष्काळासारखी कितीही संकटे आली तरी लाचारी न पत्करता, कोणाकडे भीक न मागता, कष्ट करून स्वाभिमानाने जीवन जगतात. प्रसंगी सर्कशीत शारीरिक कसरतीची कामे करताना वाघाच्या तोंडात हात घालायलाही माणदेशी माणसे तयार असतात, असेही शरद पवार यांनी फडणवीस यांना खास माहितीस्तव सांगितले. सांगोला भागात भाजपने कितीही उभारी धरण्याचा प्रयत्न चालविला तरी त्यास सांगोल्याची जनता प्रतिसाद देणार नाही, असा पवार यांचा उद्देश होता खरा; शिवसेना, राष्ट्रवादीसह अनेक पक्ष फोडण्यात माहीर असलेल्या भाजपसाठी सांगोल्यात शेकाप फोडणे जास्त कठीण बाब मानले जात नाही. त्याची चुणूक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दिसून येते.
गणपतराव देशमुख यांनी तब्बल साठ वर्षे सांगोल्यात शेकापची कडेकोट बांधणी करून विरोधकांची ताकद वाढू दिली नव्हती. परंतु आपल्या राजकीय आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना स्वतःचा वारसदार निर्माण करता आला नाही. परिणामी, त्यांच्या पश्चात पक्षात गोंधळाची स्थिती पाहायला मिळते. मागील २०१९ सालच्या सांगोला विधानसभा निवडणुकीत स्वतः गणपतराव देशमुख यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी शरीर साथ देत नसल्यामुळे स्वतःची निवृत्ती जाहीर केली आणि शेवटच्या क्षणी उद्योजक भाऊसाहेब रूपनर यांची उमेदवारी जाहीर केली. परंतु त्यावरून पक्षात गोंधळ उडाला. त्यामुळे शेवटी रूपनर यांच्याऐवजी गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख यांची उमेदवारी पुढे आणावी लागली. मात्र तेथूनच शेकापमध्ये फुटीला सुरूवात झाली. उमेदवारी जाहीर करून नंतर नाकारली गेल्याने नाराज झालेले भाऊसाहेब रूपनर यांनी थेट बंडखोरी करून प्रतिस्पर्धी शिवसेनेचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांना उघडपणे मदत केली. दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनीही मित्र पक्ष शेकापच्या विरोधात ॲड. शहाजीबापू पाटील यांना मदत केली होती. शेवटी व्हायचा तो परिणाम झाला. गणपतरावांना आपल्या नातवाचा धक्कादायक पराभव पाहावा लागला. नंतर थोड्याच दिवसांत गणपतराव देशमुख निवर्तले. त्यांच्या पश्चात त्यांचे नातू डॉ. अनिकेत यांच्याबरोबर दुसरे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख हे शेकापची धुरा सांभाळण्यासाठी पुढे सरसावले. वास्तविक पाहता डॉ. अनिकेत आणि डॉ. बाबासाहेब हे दोघेही चुलत बंधू राजकारणात पूर्णतः नवखे. त्यांना किमान पाच-दहा वर्षांपूर्वी गणपतरावांकडून राजकीय धडे मिळणे अपेक्षित होते. आता या दोन्ही नातवांना आपापल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी आणि भाजपकडून होत आहेत. डॉ. बाबासाहेब देशमुख हे पूर्णवेळ राजकारण आणि जनतेच्या संपर्कात राहून शेकापची बांधणी करीत आहेत. तर डॉ. अनिकेत देशमुख हे देखील वैद्यकीय व्यवसायाचे प्रशिक्षण संपवून पक्ष बांधणीसाठी सहभागी झाले आहेत. परंतु दोघेही वेगवेगळ्या मार्गाने पक्ष बांधणी करीत असल्यामुळे दोघांचे स्वतंत्र दोन गट पाहायला मिळतात.
डॉ. बाबासाहेब देशमुख हे शरद पवार यांच्याकडे झुकले तर डॉ. अनिकेत देशमुख यांचा कल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजेच भाजपकडे असल्याची सांगोल्यात सार्वत्रिक चर्चा ऐकायला मिळते. या दोघा तरूण नेत्यांच्या वेगवेगळ्या वाटा असल्याचे साक्षीत्व गणपतराव देशमुख पुतळा अनावरण सोहळ्यात पाहायला मिळाले. समारंभात संयोजक म्हणून डॉ. अनिकेत देशमुख यांनी मनोगत मांडले. परंतु डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे मनोगत न झाल्यामुळे त्यांचे समर्थक संतापले. त्याचे पडसाद समारंभ संपल्यानंतर लगेचच उमटले. बाबासाहेबांच्या समर्थकांनी गणपतराव देशमुखांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करून बाबासाहेबांच्या बाजूने शक्तिप्रदर्शन केले. यातच भर म्हणून पक्षात नाराज राहिलेले जिल्हा सचिव बाबासाहेब करांडे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. करांडे हे पक्षात तुलनेने नवखे. पण बहुसंख्य जुने नेते व कार्यकर्ते अद्यापि पक्षात टिकून आहेत. पण आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत पुलाखालून कसे आणि किती पाणी वाहून जाईल, यावरून पक्षाची वाटचाल अवलंबून आहे.