बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध गायक के.के यांची हत्या झाल्याचा आरोप भाजपातर्फे करण्यात आला आहे. भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी हा आरोप केला आहे. खासदार सौमित्र खान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून के.के यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर काँग्रेस आणि सीपीएम यांच्यासारख्या इतर विरोधी पक्षांनी या घटनेचा तटस्थपणे तपास करण्याची भुमिका घेतली आहे.
या आरोप प्रत्यारोपांमुळे सरकारवर कुठलाही डाग लागू नये याची काळजी तृणमूल काँग्रेस घेताना दिसत आहे. के. के यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पश्चिम बंगाल सरकारने घेतला. अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह इतरही अनेक जेष्ठ मंत्री उपस्थित होते.
कोलकाता येथे एका भरगच्च कार्यक्रमातील सादरीकरणानंतर हॉटेलवर परतत असताना के.के यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर काही वेळातच त्यांच्या निधनाची बातमी आली. कार्यक्रमादरम्यानच्या व्हिडीओमध्ये के. के हे थकलेले दिसत होते आणि त्यांना दरदरून घामही आला होता.
के. के यांच्या निधनानंतर भाजपाचे माझी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी गंभीर आरोप केला आहे.ते म्हणाले की ” हा कार्यक्रम तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आयोजित केला होता. के.के यांनी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचे सांगूनही त्यांना निघायची परवानगी देण्यात आली नाही. त्या अवस्थेतच त्यांना गाणे गाण्यास भाग पाडले. के. के यांची हत्या झाली आहे”. त्यांनी या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सिपीएमचे शतरूप घोष म्हणाले की “तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी विभागाल वैज्ञानिक माहिती नाही. त्यांनी २००० प्रेक्षक क्षमता असणाऱ्या सभागृहात ७००० लोकांना प्रवेश दिला. सभागृहातील वातानुकूलित यंत्रणा सदोष होती. त्यात अग्नीशामक फवारणी करण्यात आली. त्यामुळे सभागृहात कार्बनडाय ऑक्साईडची पातळी वाढली. त्यामुळे सभागृहाचे रूपांतर गॅस चेंबरमध्ये रूपांतर झाले. यामुळेच के. के यांचा मृत्यू झाला.
तृणमूल काँग्रेसने सर्व आरोपांचे खंडन केले आहे. टीएमसीचे जेष्ठ नेते शशी पंजा आणि कुणाल घोष यांनी भाजपावर संधीसाधू राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. यामागे सत्ताधारी पक्षाची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न असल्याचा प्रती आरोप त्यांनी केला आहे. पंजा पुढे म्हणाले की “शवविच्छेदनात डॉक्टरांनी के. के यांच्या मृत्यूचे कारण स्पष्टपणे सांगितले आहे. बंगालमधील भाजपा नेते राज्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीवर हल्ला करत आहेत हे दुर्दैव आहे”.