अकोला : महाराष्ट्रातील सत्ताकारणात सातत्याने राजकीय भूकंपाचे धक्के बसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फाटाफूट झाली. त्याचे परिणाम जिल्ह्यात उमटले. जिल्हा राष्ट्रवादीत शहर व ग्रामीण असे दोन गट पडले आहेत. दोन गटांतील विभागणीमुळे पक्ष अधिक कमकुवत झाल्याचे चित्र असून निवडणुकांच्या तोंडावर अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादीची वाट अधिक बिकट झाली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी मोठी घडामोड गेल्या रविवारी घडली. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नऊ नेते मंत्रीपदाची शपथ घेऊन सत्तेत सहभागी झाले. राष्ट्रवादीतील मोठा गट फुटला. या फोडाफोडीच्या राजकारणावरून आरोप-प्रत्यारोपाचे वाकयुद्ध रंगले आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण, नाराजीनाट्य उफाळून आले. शरद पवार की अजित पवार, नेमकी कुणाला साथ द्यायची? या संभ्रमात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अगोदरच गटातटाच्या राजकारणात बेजार झाला. आता तर वरिष्ठांनीच जाहिररित्या बंड केले. त्यामुळे जिल्हा पातळीवरील नेत्यांनीही सोयिस्करपणे आपआपले गट निवडले आहेत. नेते व पदाधिकाऱ्यांच्या विभागणीमुळे पक्षाच्या संघटनात्मक बळकटीवर विपरित परिणाम झाला असून ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.
हेही वाचा – दोघांनीही आपले ‘उप’ पद वाचविले !
राष्ट्रवादी काँग्रेस हा सुरुवातीपासून नेत्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातही तीच स्थिती होती. नेते जास्त व कार्यकर्ते कमी अशी गत राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. मूर्तिजापूर मतदारसंघातून तुकाराम बिडकर राष्ट्रवादीचे एकमेव आमदार २००४ मध्ये निवडून आले होते. पंचवीशीकडे वाटचाल करणाऱ्या राष्ट्रवादीला आतापर्यंत जिल्ह्यातून दुसरा आमदार निवडून आणता आला नाही. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर मात्र राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे धोत्रे, कोरपे, तिडके कुटुंबियांचे पक्षात वर्चस्व आहे. त्यामुळेच जिल्हा बँक, खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर राष्ट्रवादीने आपला दबदबा कायम ठेवला. इतर सर्वच निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची कामगिरी सुमार राहिली. पक्षांतर्गत वाद, गटतट व कुरघोडीच्या राजकारणामुळे नेते संघटनात्मक बळकटीसाठी कधी एकसंघ आलेच नाहीत. दरम्यान, मध्यंतरीच्या काळात अजित पवार यांच्या आग्रहामुळे अमोल मिटकरी यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली. जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना ते रुचले नाही. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीला आमदारकीचा फायदा होण्याऐवजी नाराजीचा फटकाच बसला.
आतापर्यंत राष्ट्रवादीची जिल्हा व महानगर कार्यकारिणी आपला वेगवेगळा ‘अजेंडा’ राबवत होती. पक्षातील फुटीनंतर आता आमदार अमोल मिटकरी, विजय देशमुख, कृष्णा अंधारे हे अजित पवारांकडे गेले आहेत, तर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, ग्रामीणची कार्यकारिणी शरद पवारांकडे कायम आहे. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याने दोन्ही गटांकडून शह-काटशहाच्या राजकारणाला अधिक वेग आला. आगामी काळात महानगरपालिका, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या तोंडावरच राष्ट्रवादी गटातटात विभागल्या गेला. आता पक्षाचे संघटन नव्याने उभे करून निवडणुकांना समोर जाण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांपुढे राहणार आहे.
हेही वाचा – सोलापुरात पर्यायी नेतृत्व उभे करण्याचे शरद पवारांपुढे आव्हान
सहकार क्षेत्रातील वर्चस्वाला धोका?
सहकार क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले निर्निवाद वर्चस्व कायम राखले. नुकत्याच झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीमध्येसुद्धा हे चित्र दिसून आले. सहकारातील वरिष्ठ नेते शरद पवारांच्या गोटातील आहेत. मात्र, आता सत्ताकेंद्र अजित पवारांकडे गेल्याने त्यांची अडचण होऊ शकते. परिणामी, सहकारातील वरिष्ठ कोंडीत सापडले आहेत. या वादातून राष्ट्रवादीच्या सहकार क्षेत्रातील वर्चस्वाला धोका बसण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.