नवी मुंबई : भाजप नेते गणेश नाईक यांचे माजी आमदार पुत्र संदीप यांनी बंडाचे निशाण फडकविल्याने गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या नवी मुंबई शहरात आता सर्वच पक्षात उघड बंडाचे वारे वाहू लागले असून या बंडोबांना आवरताना नेत्यांच्या नाकीनऊ येऊ लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संदीप नाईक यांनी ‘तुतारी’ हाती घेताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे उपनेते विजय नहाटा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीचे याच मतदारसंघातील एक नेते मंगेश आमले यांनी शनिवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत नाईकांविरोधात दंड थोपटले तर ऐरोलीत गणेश नाईक यांच्या विरोधात शिंदेसेनेचे नेते विजय चौगुले यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा करत मुख्यमंत्र्यांचा ‘ताप’ वाढविला आहे.

बेलापूर मतदारसंघातून भाजपने मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर होताच संदीप यांनी ‘तुतारी’ हाती घेत मोठया बंडाला सुरुवात केली. या मतदारसंघातून शिंदेसेनेचे नेते विजय नहाटा यांनी त्यापुर्वीच निवडणुक लढविण्याची घोषणा करत महायुतीची डोकेदुखी वाढवली होती. शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत असल्याची घोषणाही नहाटा यांनी केली होती. मात्र गेल्या आठवड्यात घडलेल्या वेगवान घडामोडीनंतर संदीप नाईक यांचा मोठया पवारांच्या पक्षातील प्रवेश ठरला आणि नहाटांची कोंडी झाली. संदीप यांच्या भूमीकेनंतर शिंदेसेनेच्या नेत्यांनी वाशीत एक मेळावा घेतला. या मेळाव्यात मंदा म्हात्रे यांच्यामागे ताकद उभी करण्याचे ठरले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नहाटा यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करत सर्वांनाच चकीत केले. नहाटा यांच्या बंडामुळे महायुतीत फुट पडली असून यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापल्याची चर्चा आहे.

हेही वाचा >>>मेळघाटातून काँग्रेसचा नवा डाव; जनाधार पुन्हा मिळवण्याचे आव्हान

पवारांच्या पक्षातही बंडाचे वारे

संदीप नाईक, विजय नहाटा यांच्या बंडानंतर आता पवारांच्या राष्ट्रवादीतही बंडाचे वारे वाहू लागले आहेत. या पक्षाचे नेते मंगेश आमले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर करत बंडाचे निशाण फडकाविले आहेत. बेलापूर विधानसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, नारायणगाव, राजगूरुनगर भागातील मुळ रहिवाशी असलेल्या नागरिकांचा मोठया प्रमाणावर समावेश आहे. यातील बहुसंख्य मतदारांना मोठे पवार आपलेसे वाटतात. नेमके हेच गणित लक्षात घेऊन संदीप यांनी तुतारीचा पर्याय निवडला असतानाच आमले यांनी मात्र आक्रमक भूमीका घेतल्याने संदीप यांच्या गोटातही अस्वस्थता आहे. आमले स्वत: पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांचे गणित जुळविताना दिसत आहेत.

हेही वाचा >>>“पार्सल उमेदवार नको,” भाजपच्या दोन माजी आमदारांचा देवराव भोंगळे यांना विरोध

विजय चौगुलेही बंडाच्या तयारीत

ऐरोली विधानसभा मतदारसंघात गणेश नाईक यांच्याविरोधात विजय चौगुले यांनीही बंडाची तयारी सुरु केली असून मंगळवारी ते उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. नवी मुंबईत पक्षात होत असलेली बंडाळी रोखावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी खासदार नरेश म्हस्के यांना दिले असले तरी नवी मुंबईतील नेते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईतील काही नेत्यांकडे संताप व्यक्त केल्याचे समजते. बेलापूरमध्ये कोणत्याही परिस्थितीत मंदा म्हात्रे यांच्या विजयासाठी कामाला लागा असा संदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

‘तुम्ही घर पाडायचे ते आम्ही बांधायचे. त्यावर कौल चढवायचे आणि पुन्हा ते घर आदेश येताच तुमच्या ताब्यात द्यायचे हे आता चालणार नाही. मला निवडणुकीची तयारी करा असा आदेश आला. मात्र अचानक संदीप नाईक यांनी प्रवेश करताच मला बाजूला सारले. असा अन्याय यापुढे कार्यकर्ते आणि मतदार सहन करणार नाहीत.-मंगेश आमले, बंडखोर राष्ट्रवादी काॅग्रेस ( शरद पवार)