महेश सरलष्कर
‘भारत जोडो’ यात्रा आत्ता हिंगोलीमध्ये असून काँग्रेससाठी नांदेडमधील टप्पा अत्यंत यशस्वी ठरला आहे. महाराष्ट्रात यात्रेला मिळालेल्या लोकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे काँग्रेसचे केंद्रातील नेते खूश झाले असून या आयोजनाचे सर्व श्रेय अशोक चव्हाण यांना दिले जात आहे. तसेच त्यांच्याबाबत सुरू असलेल्या पक्षांतराच्या संशयाचे मळभही दूर झाले आहे.
काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या, पण, त्याकडे दुर्लक्ष करत चव्हाण यांनी यात्रेचे सूक्ष्म स्तरावर आयोजन केले. इथे कर्नाटकप्रमाणेच लोकांचे जत्थेच्या जत्थे यात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नांदेडमध्ये मराठीतून भाषण केले. नांदेडच्या टप्प्यामध्ये प्रदेश काँग्रेसमधील बहुतांश ज्येष्ठ नेते सहभागी झालेले दिसले. राहुल गांधी यांच्यासोबत पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांची पदयात्रेतील हसरी छायाचित्रेही चर्चेचा विषय ठरली आहेत. राहुल गांधी भेटत नाहीत, या आरोपावर ही छायाचित्रे अप्रत्यक्षपणे उत्तर असल्याचे केंद्रातील काँग्रेस नेत्याचे म्हणणे आहे. या यात्रेमुळे राहुल यांचा लोकांशी आणि काँग्रेस नेत्यांशी संपर्क वाढला असून पक्षाला त्याचा लाभ मिळेल, असे ‘भारत जोडो’ यात्रेच्या आयोजनात सहभागी असलेल्या नेत्याचे म्हणणे आहे.
हेही वाचा: ‘भारत जोडो’साठी अकोल्यातील बाळापूरच्या शेतकऱ्याने उभे पीक कापून जागा दिली
राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तसेच, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेतेही यात्रेमध्ये सहभागी झाल्यामुळेही काँग्रेसचा उत्साह दुणावला आहे. केरळमध्ये ‘यूडीएफ’ आघाडीतील घटक पक्ष यात्रेमध्ये सहभागी झाले होते. पण, महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने एकदिलाने घटक पक्षाचे नेते सामील झाले होते, असे काँग्रेस नेत्यांना वाटते. ‘भारत जोडो’ यात्रा काँग्रेसला मजबूत करण्यासाठी काढलेली आहे, असे विधान पक्षाचे माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी केले होते. मात्र, काँग्रेसने पहिल्यांदाच घटक पक्षांच्या यात्रेतील सहभागाबद्दल सकारात्मक भूमिका घेतली आहे! राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आदी नेते तर, शिवसेनेकडून (उद्धव गट) आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्या गळाभेटीचीही चर्चा केली जात आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी पूर्णपणे एकत्र असल्याचे हे द्योतक आहे, असे काँग्रेसच्या नेत्याने सांगितले. केंद्रातील काँग्रेस नेते राज्यातील महाविकास आघाडीकडे अधिक गांभीर्याने पाहू लागल्याचे या ज्येष्ठ नेत्याने सूचित केले.
हेही वाचा: मनोज मोरे : प्रस्थापितांशी संघर्ष
‘भारत जोडो’ यात्रेने ६२ दिवस पूर्ण केले असून ही यात्रा महाराष्ट्रातून उत्तर भारतात प्रवेश करेल. आत्तापर्यंत २८ जिल्ह्यांमधून यात्रेने प्रवास केला असून यात्रेने निम्मा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्रामध्ये १३ दिवसांच्या प्रवासानंतर ही यात्रा मध्य प्रदेशमध्ये जाईल. तिथेही १३ दिवसांच्या प्रवासानंतर, राजस्थान मग, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरला जाईल. कर्नाटकमध्ये बेल्लारीमध्ये राहुल गांधी यांची पावसातील जाहीरसभा प्रचंड गाजली होती. महाराष्ट्रात १८ नोव्हेंबर रोजी राहुल गांधींची जाहीर सभा होणार असून कर्नाटकप्रमाणे इथेही लोकांच्या प्रतिसादाची काँग्रेसला अपेक्षा आहे. १५ नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांची जयंती साजरी केली जाणार आहे. १७ नोव्हेंबरला राहुल गांधींची पत्रकार परिषद होईल. २१ नोव्हेंबर हा यात्रेचा विश्रांतीचा दिवस असेल.