सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्याचे परिणाम आता दिसत असून विट्यातील खासदार शरद पवार यांच्याशी निष्ठा व्यक्त केलेल्या माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचा गटच संभ्रमात दिसत आहे. ‘शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण’ अशी जाहीर भूमिका जयंत पाटील यांनी घेतली असताना विटा नगरीत वर्चस्व असलेल्या पाटील गटाने भाजप खासदार, आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांना एका कार्यक्रमास खास निमंत्रित करून वेगळी दिशा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीत राहायचे तर निष्ठा कोणाशी ठेवायची हा जसा या गटापुढे यक्ष प्रश्‍न असताना भाजपशी सलगीही आवश्यक वाटते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाची भौगोलिक रचनाच मुळात तीन तालुक्यांत विभागली गेली आहे. खानापूर व आटपाडी या दोन तालुक्यांचा समावेश असताना तासगाव तालुक्यातील विसापूर मंडळातील गावांचा या मतदारसंघात समावेश आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांचे जेष्ठ सहकारी अनिल बाबर यांच्याकडे आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात बाबर यांना संधी मिळेल असे अपेक्षित असताना राष्ट्रवादीमध्ये फूट पडून मोठा गट सरकारमध्ये सहभागी झाला. अचानकपणे सत्तेत सहभागी झालेल्यांना मंत्रीपदे आणि तीही वजनदार मिळाली. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या बरोबरीने सुरतमार्गे गुवाहाटी गेलेल्या आमदार बाबर यांना मंत्रीपदासाठी अजूनही प्रतिक्षाच करावी लागत आहे.

हेही वाचा – पावसाची विश्रांती! आता काही दिवस सूर्यनारायण डोकावणार

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली खासदार पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय जाहीर केला. पदाधिकार्‍यांनीही तसाच निर्णय जाहीर केला. उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या गटात जाण्याचे आणि आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात जाण्याचे निदान वरकरणी तरी अद्याप कोणी धाडस केलेले नसले तरी काही मंडळी अजूनही दोन्ही दरडीवर हात ठेवून राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या शुभेच्छा जाहिरातीवर कार्यकर्त्यांनी खासदार पवार यांच्यासोबतच अजितदादांंचेही छायाचित्र लावले होते. मात्र, या फलकावरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या छायाचित्राला स्थान मिळाले नव्हते. माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचीही अद्याप थोरल्या पवारासोबत की धाकल्या पवारांसोबत याबाबतच स्पष्टता दिसत नाही. यामुळे हा गट अजून संभ्रमात राहणार असे दिसत असताना त्यांची जवळीक भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्याशी दिसत आहे.

खासदार पाटील आणि आमदार बाबर यांच्यामध्ये यशवंत कारखान्यावरून मतभेद आहेत. या कारखान्याची विक्री काँग्रेसचे माजी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांचे मेव्हणे आणि जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्याशी संबंधित असलेल्या कंपनीला करण्यात आली. गेल्या आठ दहा वर्षांपासून कारखान्याच्या मालकीहक्कावरून अगदी कोर्टकचेर्‍या, राजकीय डाव-प्रतिडाव सुरू असल्याने राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या शिंदे गटाकडून मदत मिळणार नाही हे गृहित धरूनच खासदार पाटील नवे मित्र जोडण्याच्या नादी लागले आहेत. यातूनच त्यांची विट्याच्या पाटील गटाशी जवळीक वाढली आहे.

हेही वाचा – महात्मा फुलेंसंदर्भात संभाजी भिडेंचा ‘यू टर्न’; अमरावतीमध्ये टीका अन् अकोल्यात अभिवादन

महाविकास आघाडीच्या काळात जलसंपदा खाते जयंत पाटील यांच्याकडे होते. त्यावेळी टेंभू योजनेच्या वाढीव कामाला मंजुरी मिळाल्याबद्दल गावोगावी फलकबाजी करीत पाणीदार आमदार म्हणून घेणारे आमदार बाबर यांना शह देण्याचा प्रयत्न केला होता. यातून बाबर आणि पाटील गटातील पारंपारिक राजकीय संघर्ष नव्याने लोकासमोर आला. मात्र दोन्ही गटांना आटपाडीचे सहकार्य घेतल्याविना निर्णायक आघाडी मिळू शकत नसल्याने देशमुख गटाशी संधान बांधण्याचा प्रयत्न सुरू आहेत. गतवेळी देशमुख यांनी आपले योगदान बाबर यांच्या पारड्यात टाकले होते. मात्र, यावेळी झालेल्या माणगंगा साखर कारखाना निवडणूक आणि जिल्हा बँक निवडणुकीत आमदार बाबर यांचे सहकार्य देशमुखांना मिळाले नसल्याचा आक्षेप या गटाचा आहे. तसेच आटपाडीतील जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील हे बाबर यांचे शिष्य म्हणून सांगतात. मात्र, त्यांनी माणगंगा निवडणुकीत सांगोल्याचे देशमुखांशी संपर्क साधून अखेरच्या क्षणी धोबीपछाड करीत आटपाडीच्या देशमुखांना कारखान्यातूनच बेदखल केले. यामागे राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांचा हात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप खुद्द अमरसिंह देशमुखांनी केला. याच देशमुख घराण्यातील तिसर्‍या पिढीचे नेतृत्व असलेले तरुण आणि पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांनी पाटलांच्या कार्यक्रमाला आवर्जुन लावलेली उपस्थिती वेगळेच राजकीय संकेत देणारी ठरली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the split in the ncp group of former mla sadashivrao patil from vita is in confusion print politics news ssb
Show comments