संदेशखाली प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शाहजहानला अटक केल्यानंतर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय बंगालच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन करतील. तसेच ते येथे जाहीर सभादेखील घेणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे पंतप्रधान नेमकं काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी शुक्रवार (१ मार्च) आणि शनिवार (२ मार्च) असे दोन दिवस पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असतील. यादरम्यान ते शुक्रवारी हुगळी जिल्ह्यातील आरामबाग येथे ७२०० कोटी रुपयांच्या आणि शनिवारी नादिया जिल्ह्यातील कृष्णनगरमध्ये १५ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन करतील. यावेळी ते जाहीर सभांनादेखील संबोधित करणार आहेत. याशिवाय ते पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचीदेखील सुरुवात करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – सीएए विरोधात आसाममधील विरोधीपक्ष आक्रमक, मुख्यमंत्री सरमांनीही दिलं प्रत्युत्तर; पुन्हा आंदोलन पेटणार?
यादरम्यान ते आपल्या सरकारने दहा वर्षात पश्चिम बंगालसाठी केलेल्या कामाचा पाढा वाचण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये सध्या संदेशखाली प्रचंड चर्चेत आहे. त्यामुळे या प्रकरणावरूनही तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांना लक्ष्य करण्याचीदेखील शक्यता आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यावरून ते ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी हे तीन वर्षांनंतर पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. गेल्यावेळी ते २०२१ मध्ये पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पश्चिम मेदिनीपूर येथे एका बैठकीत व्यास चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला होता. या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित होत्या. मात्र, त्या केवळ १५ मिनिटे उपस्थित होत्या, यावरून बराच वादही झाला होता.
महत्त्वाचे म्हणजे, यादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनेकदा दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. यावेळी केंद्र सरकारने विविध योजनांतर्गत राज्यांना मिळणारा निधी रोखून ठेवल्याचा आरोप केला होता, तर विविध योजनांच्या अंमलबजावणीत अनियमितता झाल्याने हा निधी रोखून धरल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते.
यासंदर्भात बोलताना तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, ”२०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये आले होते. तरीही या निवडणुकीत आम्ही २०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या. आता लोकसभा निवडणुकीपूर्वी ते पश्चिम बंगालमध्ये आले आहेत, त्यांच्या दौऱ्याचा कोणताही परिणाम निवडणुकीवर होणार नाही.”
दरम्यान, २०१९ च्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपाने १८ जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत भाजपाला ४०.३ टक्के मते मिळाली होती. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेच्या ४२ पैकी ३५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.