सुहास सरदेशमुख
छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेसह सर्व राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर वाजणारी तुतारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह झाले आणि प्रचारात तुतारी वाजविणाऱ्यांची पंचाईत झाली. अगदी कोणाच्याही व्यासपीठावर जाऊन प्रत्येकी दीड ते दोन हजार रुपये मिळणाऱ्या तुतारीवाल्यांना आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशिवाय कोणी आधार राहिलेला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील तुतारीवाल्यांचे लक्ष ‘बारामती’ कडे लागले आहे. एप्रिल व मे महिन्यातील लग्नसराईत नवरदेवासमोर तुतारी वाजविण्यासाठी घेतलेली सुपारी आता ‘आचारसंहिते’त अडकणार नाही ना?, असा प्रश्न गावोगावी तुतारी वाजविणाऱ्यांना पडला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निखिल बोराडे यांना केशवसुतांची ‘एक तुतारी द्या मज आणुनि, फुंकिन मी जी स्वप्राणाने’ ही कविता त्यांना माहीत नाही पण ते तुतारी वाजवतात. ‘ इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपनीबरोबर जोडल्या गेलेल्या निखिलची राजकीय समजही चांगली आहे. तो म्हणाला, तुतारी राजकीय पक्षाचे चिन्ह झाल्यानंतर आता अन्य पक्षातील लोक आम्हाला तुतारी वाजावयला बोलावणार नाहीत. पण लग्नसराईत तुतारी वाजवली आणि एखाद्याने प्रचार केल्याचा आरोप केला तर , असा त्यांचा बिनतोड प्रश्न. छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवार यांचा पक्ष तसा कमजोर. त्यामुळे या मतदारसंघात निखिल बोरडे यास तुतारी वाजविण्यासाठी कोण बोलावेल, ही चिंता सतावते आहे. मात्र, बारामतीमध्ये तसेच पश्चिम महाराष्टात प्रचार कार्यक्रमात तुतारी वाजविण्याची संख्या वाढली असल्याने साऱ्यांचे लक्ष आता बारामतीकडे लागले आहे. गंगापूरच्या अर्जून लिंगायत , लातूरच्या वरवंटीचा संजू रसाळ यांना मात्र अजून कोणी प्रचारसभांना तुतारी वाजविण्यासाठी आमंत्रित केले नाही. संजू रसाळ म्हणाले, ‘ लातूर मतदारसंघात कॉग्रेसची चलती असते. विलासराव देशमुख साहेब असल्यापासून तसेच आहे. पुढे भाजपचे लोकही बोलावयचे , आता बोलावतेल का माहीत नाही’ बहुतांश तुतारीवाल्यांनी आता विवाह सोहळ्यात तुतारी वाजविण्यासाठी तारखा राखून ठेवल्या आहेत. पण आपण आचारसंहितेत तर अडकणार नाही ना, ही भीती सर्वांना आहे.
आणखी वाचा-शिंदे पुत्राविरुद्ध ठाकरे गटाला उमेदवार आयातीची वेळ ?
केशवसुतांची ‘तुतारी’ ही कविता शरद पवार यांच्या राजकारणाला पुरक ठरू शकणारी आहे. त्यामुळेच आता ‘तुतारी’तील काही ओळी समाजमाध्यमांमध्ये दिसू लागल्या आहेत. त्या अशा –
‘गतशतकांची पापे घोरे
क्षालायाला तुमची रुधिरे
पाहिजेत रे! स्त्रैण न व्हा तर!
धर्माचे माजवुनी अवडंबर
नीतीला आणिती अडथळे
विसरुनिया जे जातात खुळे
नीतीचे पद जेथे न ढळे
धर्म होतसे तेथेच स्थिर
हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर
शुरांनो! या त्वरा करा रे!
समतेचा ध्वज उंच धरा रे! ’
आणखी वाचा-जालन्यातील मतदारयाद्यांमध्ये तरुण-तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत
व्यासपीठावर तसेच समाजमाध्यमातून व्यक्त होणारी अशी राजकीय मांडणी तुतारीवाल्यांच्या जगण्यात मात्र नाही. यातील संजू रसाळ म्हणाले, ‘ तुतारी वाजवायला दमसास अधिक लागतो. तो ज्यांच्याकडे अधिक असेल तोच तुतारी वाजवू शकतो.’ त्यांचे हे वाक्य राजकीय नाही, अनेकांची संसार अवलंबून असणारा हा व्यावसाय आचारसंहितेमुळे तसेच एकाच पक्षाला निवडणूक चिन्ह मिळाल्यामुळे आक्रसून गेला असल्याची भावना अधिक आहे. त्यातून आपापल्या भागातील शरद पवार गटाचा नेता कोण, हेही तुतारीवाले शोधत आहेत. संभाजीनगर शहरातील शक्तीसिंग होलिये नावाचा तुतारीवाला म्हणाला, धंद्यावर अजूनही तरी फार परिणाम झालेला नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट असल्याने महाविकास आघाडीच्या सभा होतील, त्या सभेत बोालवून येईल. पण पूर्वी सहा पक्ष बोलावत होते तर आता तीनच पक्ष बोलावतील, हे मात्र घडेल.’