नागपूर: शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जरा महायुती सरकारवर टीका केली की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांना विकास विरोधी ठरवते, पण याच पक्षाच्या नेत्यांना मात्र भाजप वाजत गाजत पक्षात प्रवेशही देते. हिंगणा विधासभा मतदारसंघातील शरद पवार गटाच्या महिला नेत्या , जि.प.च्या माजी सभापती उज्वला बोढारे यांचा शनिवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला.
प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बावनकुळे आक्रमकपणे विरोधकांचा समाचार घेतात. पक्षात अनेक प्रवक्ते आहेत. पण नागपुरात ते स्वत:च सर्व मुद्यांवर माध्यमापुढे भूमिका मांडतात. विरोधकांच्या टिकेला उत्तर देतात. काही आठवड्यापूर्वी त्यांनी मविआ नेत्यांना विकास विरोधी असल्याची टीका केली होती. महायुती सरकार विकसाच्या वाटेवर चालले असताना विरोधकांना ते सहन होत नाही, म्हणून ते टीका करतात, असे ते म्हणाले होते.
एकीकडे भाजप विरोधकांनी केलेली कोणतीही टीका सहन करीत नाही, दुसरीकडे मात्र विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा म्हणून प्रयत्न केले जातात. नागपूर जिल्ह्यात हिंगणा मतदारसंघात भाजपला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील एक महिला नेत्याला आपल्या पक्षात आणण्यात यश आले.
जिल्हा परिषदेच्या माजी सभापती उज्वला बोढारे यांचा भाजप प्रवेश झाला. या भागाचे आमदार समीर मेघे यांनी भविष्यातील राजकारण सुरक्षित करण्यासाठीचा हा पक्ष प्रवेश घडवून आणल्याचे भाजपमध्येच चर्चा आहे. भाजपला मविआचा ऐवढा राग आहे तर या पक्षाचे नेते कसे चालतात, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला. यापूर्वी भाजपने उमरेड तालुक्यातील काँग्रेसच्या सरपंचाना आपल्या पक्षात घेतले होते. देशातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणवून घेणारा भाजप इतर पक्षांना का फोडतो असा सवाल राजकीय वर्तुळात केला जात आहे.
बोढारे कोण आहेत ?
हिंगणा तालुक्यातून उज्वला बोढारे या दोन वेळा राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादीने त्यांना महिला व बाल कल्याण सभापतीही केले होते.राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री रमेश बंग यांच्या गटाच्या म्हणून त्यांची राजकारणात ओळख होती. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्या हिंगणा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या.पण ऐनवेळी वयोवृद्ध रमेश बंग रिंगणात उतरले. त्यामुळे भाजपचे फावले व बोढारे यांचा इच्छाभंग झाला. त्यामुळे त्या नाराज होत्या. ही नाराजी ओळखून भाजपने त्यांच्यावर जाळे टाकले. या मतदारसंघात भाजपचा कट्टर विरोधक म्हणून राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षआहे यातील प्रमुख नेत्यांना पक्षात घेऊन मतदारसंघावर ऐकहाती सत्ता गाजवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे,