उमाकांत देशपांडे
मुंबई : मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थानमधील दणदणीत विजयामुळे भाजपची ताकद वाढली असून, राज्यातील लोकसभेच्या किमान ३४-३५ जागा लढविण्याचा पक्षाचा मानस आहे. उर्वरित जागा शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना दिल्या जातील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजप व शिवसेनेचे गेल्या लोकसभा निवडणुकीत २५-२३ असे जागावाटप जाहीर झाले होते, तरी पालघरमध्ये राजेंद्र गावीत यांना भाजपने शिवसेनेत पाठवून उमेदवारी दिली होती, तर अमरावतीत नवनीत राणा यांना पाठिंबा होता. लोकसभा व विधानसभेतही शिवसेनेचे काही उमेदवार हे भाजप पुरस्कृत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा दणदणीत मताधिक्याने पंतप्रधान व्हावेत आणि राज्यासाठीचे भाजपचे ४५ हून अधिक विजयाचे ध्येय साध्य व्हावे, यासाठी भाजप सर्वाधिक जागा लढविणार आहे.

हेही वाचा… तेलंगणातील पराभवाने भारत राष्ट्र समितीच्या राज्यातील नेत्यांमध्ये चलबिचल, एमआयएममध्येही चिंता

राज्यातील महायुतीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे १३ खासदार असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बारामती, शिरूर, सातारा व रायगड अशा चार जागांवर दावा केला आहे. मात्र जागावाटपात एवढ्या जागा भाजप शिंदे-पवार गटाला देण्याची सुतराम शक्यता नसल्याचे उच्चपदस्थ भाजप नेत्याने ‘ लोकसत्ता ‘ ला सांगितले.

हेही वाचा… भाजपच्या विजयाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार?

भाजप गेल्या निवडणुकीत लढविलेल्या २५ आणि पालघर, अमरावती या जागा कमळ चिन्हावर लढविणार आहे. त्याचबरोबर रायगड, उत्तर-पश्चिम मुंबई , सातारा, शिरूर यासह आणखी दोन-तीन ठिकाणी भाजप कमळ चिन्हावर आपले उमेदवार उभे करण्याची चाचपणी करीत आहे. त्याबदल्यात शिंदे-पवार गटाच्या विद्यमान खासदारांना किंवा त्यांच्या उमेदवारांना विधानसभेच्या जागा सोडण्याचा व पुढील सरकारमध्ये मंत्रीपदांचा प्रस्ताव दिल्या जाण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपला ४५ जागांचे लक्ष्य गाठायचे असेल, तर किमान ३४-३५ जागा कमळ चिन्हावर लढवाव्या लागतील, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live: “मोदी है तो भाजपा है..”, निकालांवरुन संजय राऊत यांचा टोला; यासह महत्त्वाच्या बातम्या

त्यासाठी भाजपने दोन-तीन राष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांमार्फत व्यापक सर्वेक्षण व जनमत कौल अजमावण्याची मोहीम होती घेतली आहे. त्यांचा एक अहवाल तीन महिन्यांपूर्वी आला असून या महिनाअखेरीस पुढील सर्वेक्षणाचा अहवाल येईल. त्यानंतर भाजप आणि शिंदे-पवार गटाचे जागावाटप अंतिम केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विजयी झालेल्या जागा त्या पक्षांकडे राहतील, हे जागावाटपाचे प्राथमिक सूत्र असले, तरी आगामी निवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार कोण, त्या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती काय आहे, त्या उमेदवाराला जनतेचा आणि पक्ष कार्यकर्त्यांचा किती पाठिंबा आहे किंवा नाराजी आहे, त्याच्या विजयाची खात्री किती आहे, यासह अनेक मुद्द्यांचा विचार सर्वेक्षण अहवालाच्या आधारे जागावाटपासाठी केला जाईल आणि नंतर केंद्रीय नेत्यांकडून जागावाटप अंतिम होईल. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यातूनही काही नेते भाजपमध्ये पुढील काळात येऊ शकतात. भाजपला लोकसभेसाठी कोणताही धोका पत्करण्याची तयारी नसून विजयाची खात्री असलेल्या नेत्यालाच उमेदवारी दिली जाणार आहे, असे सूत्रांनी नमूद केले.

भाजपने मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थानमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे आणि मोदी यांचा जनमानसावर किती प्रभाव आहे, हे सिद्ध केले आहे. त्यामुळे शिंदे-पवार गटाकडूनही जागावाटपासाठी कोणतीही अडचण किंवा अडवणूक होणार नाही, असा भाजप नेत्यांना विश्वास आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After victory in three assembly elections of states in maharashtra bjp going to claim more seats for lok sabha print politics news asj
Show comments