एजाजहुसेन मुजावर
सोलापूर : राजकीय निवृत्तीकडे झुकलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे अलिकडे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याच सूचनेनुसार पक्षाचा सोलापूर शहर शाखेचा अध्यक्ष बदलण्यात आला आहे. गेली सहा वर्षे शहराध्यक्षपदाची धुरा वाहिलेले प्रकाश वाले हे पायउतार झाले. त्यांच्या पश्चात चेतन नरोटे यांची शहराध्यक्षपदावर वर्णी लागली आहे. सुशीलकुमार शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून नरोटे यांची अलिकडे ८ वर्षांत ओळख निर्माण झाली आहे. पक्षाच्या शहराध्यक्षपदी त्यांची नेमणूक होणे अपेक्षित होते. पक्षात स्थानिक पातळीवर असा हा खांदेपालट झाल्यानंतर पक्षाची क्षीण झालेली ताकद वाढवून आगामी सोलापूर महापालिका निवडणुकांमध्ये सत्ता मिळविण्याचे आव्हान पेलताना नरोटे यांच्यापेक्षा सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या तथा काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर राहणार आहे. सुशीलकुमार शिंदे हे राजकारण पूर्ण वेळ देऊन किती गांभीर्याने पाहतात, यावर पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे.
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या सोलापुरात अलिकडे पक्षाची ताकद उत्तरोत्तर घटत गेली आहे. २०१४ आणि २०१९ या लागोपाठ दोन्ही लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमध्ये सुशीलकुमार शिंदे यांना दारुण पराभव पत्करावा लागला असतानाच २०१७ साली सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसकडून भाजपने सत्ता हिरावून घेतली. त्यात काँग्रेसचे महापालिकेत कसेबसे अवघे १४ नगरसेवक निवडून येऊ शकले. एकीकडे भाजपचा वाढता प्रभाव असताना दुसरीकडे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे माजी महापौर महेश कोठे, तौफिक शेख आदींनी काँग्रेसला नेस्तनाबूत करण्यात धन्यता मानली होती. मागील विधानसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांनी आपले एकमेव अस्तित्व कसेबसे राखले.
हेही वाचा… तमणगोंडा रवि पाटील : ग्रामीण विकासासाठी वचनबद्ध
अशा प्रकारे सोलापुरात काँग्रेसचा पाय दररोजच खोलात चालला असताना पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनाही बरीच कसरत करावी लागली. सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या मर्जीनुसार पक्षाचा गाडा हाकत असताना वाले यांच्या नेतृत्वाला मर्यादा पडल्या. यातच पक्षाला लागलेली गळती वाढतच गेली. पक्षाचे जुने जाणते अभ्यासू नेते, माजी महापौर ॲड. यू. एन. बेरिया, दुसऱ्या माजी महापौर नलिनी चंदेले, माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल आदींनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणे पसंत केले. पक्षाला सावरण्याचे प्रयत्न झाले नाहीत.
हेही वाचा… महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाचे पडसाद; मध्यरात्रीपासून कोल्हापुरात बंदी आदेश लागू
या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवर पक्षात असलेले सुशीलकुमार शिंदे यांचे महत्त्व कमी होत गेले असताना त्यांना राजकीय निवृत्तीकडे वेध लागले होते. त्यामुळे सोलापुरात सर्वस्वी शिंदे कुटुंबीयांवर अवलंबून असलेल्या काँग्रेसची अवस्था वरचेवर बिकट होत असतानाच गेल्या महिन्यात सुशीलकुमार शिंदे हे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने पक्षात पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे सोलापूरच्या काँग्रेसजनांना हायसे वाटले आहे. त्यातच आता शिंदे यांच्या इच्छेनुसार पक्षाचा शहराध्यक्ष बदलण्यात आला आहे. परंतु नवे शहराध्यक्ष चेतन नरोटे हे तरी पक्षाला सावरण्यात यशस्वी होतील का, याबाबत प्रश्नार्थक चर्चा ऐकायला मिळते.
चेतन नरोटे कोण?
सोलापुरात काँग्रेसची मजबूत पकड असताना सुशीलकुमार शिंदे यांचे स्थानिक राजकारण सांभाळणारे विष्णुपंत कोठे यांनी ज्या तरुण मंडळींची पक्षात भरती केली होती, त्यापैकीच रामलाल चौक-वारद मिल चाळीत दरारा असलेल्या नरोटे कुटुंबीयांतील चेतन पंडित नरोटे होते. कोठे यांच्या आशीर्वादाने नरोटे यांचे महत्त्व वाढले असतानाच पुढे सुशीलकुमार शिंदे आणि विष्णुपंत कोठे यांच्यात शीतयुद्ध सुरू होऊन २०१४ सालच्या सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांना महत्त्वाकांक्षी विष्णुपंत कोठे यांचे पुत्र महेश कोठे यांनी शिवसेनेच्या तर कोठे यांच्याच तालमीत तयार झालेले ‘बाहुबली’ असे तौफिक शेख यांनी एमआयएम पक्षाच्या माध्यमातून जोरदार आव्हान दिले होते. त्या वेळी प्रणिती शिंदे यांच्यापेक्षा सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांच्या दृष्टीने तो मोठा बाका प्रसंग होता. अशावेळी इंच इंच जागा लढवू, अशी स्थिती ओढवली असताना चेतन नरोटे यांनी विष्णुपंत कोठे यांची साथ सोडून प्रणिती शिंदे यांचा प्रचार केला होता. त्यांच्याच रामलाल चौक-वारद मिल चाळ भागातून प्रणिती शिंदे यांना सुमारे सात हजार एवढी मते मिळाली, जवळपास तेवढ्याच मतांची आघाडी घेऊन त्यांनी महेश कोठे आणि तौफिक शेख यांचे आव्हान परतवून लावले होते. चेतन नरोटे यांनी जर साथ दिली नसती, तर प्रणिती शिंदे यांचा पराभव अटळ ठरला असता, असे आजही राजकीय जाणकार मंडळी सांगतात. या पार्श्वभूमीवर चेतन नरोटे हे शिंदे कुटुंबीयांचे जणू सदस्यच बनले आहेत.
हेही वाचा… ‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही’; नव्या वक्तव्यामुळे भगतसिंह कोश्यारी पुन्हा चर्चेत
अतिशय विश्वासू म्हणून शिंदे कुटुंबीयांना साथ देत असताना चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाला शहर पातळीवर तेवढ्याच मर्यादाही दिसून येतात. शिंदे कुटुंबीय सदैव ज्यांना पाण्यात पाहतात, ते महेश कोठे यांच्या विरोधात टीका टिपणी करण्याचे नरोटे टाळतात. एवढेच नव्हे तर तौफिक शेख यांच्या विरोधातही जाहीर टीका करीत नाहीत. यात जणू नरोटे यांचा महेश कोठे यांच्याशी गुप्त करारच झाला की काय, असे राजकीय जाणकारांना वाटते. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपबरोबरच सध्या राष्ट्रवादीत असलेले महेश कोठे आणि तौफिक शेख यांच्याशी शिंदे कुटुंबीयांना दोन हात करावे लागणार आहेत. तेव्हा पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून चेतन नरोटे यांनाही ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यांच्यापुढे हेच खरे आव्हान आहे.