संतोष प्रधान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नोईडाचा दौरा करण्याचे टाळत असत कारण दौरा केल्यावर मुख्यमंत्रीपद जाते हा समज रुढ झाला होता. तसाच काहीसा प्रकार राज्याच्या राजकारणात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा केला जातो. कारण हिवाळी अधिवेशनताच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू होऊन अधिवेशनानंतर काही काळाने आतापर्यंत पाच मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हावे लागले. याशिवाय राजकीय पक्षात फूट पडण्याचे प्रकारही नागपूरमध्येच धडले आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात गोंधळाची परंपरा पुढे सुरू राहते का, याची उत्सुकता असेल.

नागपूरच्या गुलाबी थंडीत होणारे हिवाळी अधिवेशन राजकीय गरमागरमीसाठी प्रसिद्ध आहे. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत फूट नागपूरच्या अधिवेशनातच पडली. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना काँग्रेस पक्षाचे आमदार नागपूरमध्येच त्यांच्या अंगावर धावून गेले. नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन भरविण्यात आले आणि पाणी तुंबल्याने एक दिवस कामकाज स्थगित करावे लागले. पाणी का तुंबले याचा आढावा घेताना गटारात तत्कालीन अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना दारुच्या बाटल्या आढळून आल्या होत्या. विधान भवनाच्या आवारात नागपूरच्या पोलीस आयुक्तांचे वाहन अडकले आणि त्यांचा पारा चढला. त्यावर शेकापचे दत्ता पाटील यांनी असा काही आवाज चढविला की पोलीस आयुक्तांना गाडीतून उतरून दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. अशा काही असंख्य घटना नागपूरमध्ये अधिवेशनात घडल्या आहेत.

हेही वाचा: रविकांत वरपे : समाज माध्यमांचे समन्वयक ते प्रवक्तेपदाचा प्रवास

बँ. अ. र. अंतुले, बाबासाहेब भोसले, सुधाकरराव नाईक, मनोहर जोशी व विलासराव देशमुख या पाच मुख्यमंत्र्यांना हिवाळी अधिवेशन संपताच काही काळाने पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. साहजिकच हिवाळी अधिवेशन म्हटल्यावर कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या मनात धडकीच भरते.

भाषा बंडाची… कृती षंढाची

बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकच गोंधळ उडाला होता. काही आमदार भोसले यांच्या अंगावर धावून गेले होते. यामुळे बाबासाहेबांना चपला हातात घेऊन पळ काढावा लागला होता. या घटनेनंतरच बाबासाहेब भोसले यांचे ‘भाषा बंडाची… वृत्ती गुंडाची… कृती षंढाची’ हे वाक्य राज्याच्या राजकारणात अजरामर झाले. हिवाळी अधिवेशनातील या गोंधळानंतरच काही काळाने बाबासाहेबांना पायउतार व्हावे लागले होते.

भुजबळांचे बंड

शिवसेेनेत तेव्हा अभेद्य असा पोलादी पडदा होता. त्यातच गद्दारी केल्यावर काय होते हे ठाण्यातील श्रीधर खोपकर यांच्या हत्येतून साऱ्यांनी अनुभवले होते. अशा परिस्थितीतही छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली १८ आमदारांनी बंड केले. शिवसेनेला सोडचिठ्ी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विधानसभेत भुजबळांचा प्रवेश तेव्हा गाजला होता. काँग्रेसच्या आमदारांच्या संरक्षणात भुजबळ सभागृहात दाखल झाले होते.

हेही वाचा: विखे-पाटील मोदी, शहा, नड्डा यांच्या भेटीला; राज्य भाजपमध्ये महत्त्व वाढले ?

शरद पवार यांच्या विरोधातील फसलेले बंड

हिवाळी अधिवेशनातच तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या विरोधात बंडाचे वारे वाहू लागले. अधिवेशन संपल्यावर काही दिवसांतच विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आदींनी पवारांना हटविण्याची मागणी केली होती. पवारांच्या विरोधातील या बंडाला राजीव गांधी यांची फूस होती, असे तेव्हा बोलले जायचे. पण पवारांनी सारी शक्ती पणाला लावून खुर्ची वाचविली होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After winter session nagpur attempts topple government five chief ministers lose their post sharad pawar chagan bhujbal br antule manohar joshi sudhakar naik vilas deshmukh babasaheb bhosale print pol