सुहास सरदेशमुख

शिवेसेनेच्या औरंगाबादच्या ३७ व्या स्वाभिमान सभेच्या निमित्ताने शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा जालना लोकसभेत अपण लक्ष घालणार असल्याचे संकेत पक्षाच्या व्यासपीठावरून दिले आणि त्यास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही साथ दिली. जालना लाेकसभा मतदारसंघात सतत निवडून येणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांना पराभूत करण्यासाठी अर्जुन खोतकर हेच योग्य उमेदवार असून तो अर्जुनबाण असेल, असे सांगत सत्तार यांनी खोतकर यांचे नाव पुढे सरकावले. अन्यही महाविकास आघाडीच्या तसेच शिवसेनेच्या बैठकीत सत्तार-खोतकर यांच्यातील मैत्रभाव अनेकदा दिसून आला आहे.

एकदाही लोकसभेची निवडणूक न लढविणाऱ्या अर्जुन खोतकर यांना जालना लोकसभा निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास लावावी असे प्रयत्न असल्याचे मत या पूर्वीही अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसमध्ये असताना जाहीरपणे व्यक्त केले हाेते. दुसरीकडे रावसाहेबांना एक लाख मतांची आघाडी देण्यातही आपला वाटा होता. त्या उपकारापोटी त्याचे सुपुत्र भाजपचे आमदार संतोष दानवे हे विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करतील असेही त्यांनी सांगितले. आपले व रावसाहेब दानवे यांचे चांगले संबंध असून नुकतेच आपण त्यांच्या घरी जाऊन चहा पिऊन आलो. अर्थात ही विधाने म्हणजे वेडेपणा असल्याचा खुलासा आमदार दानवे यांनीही केला आहे. पण रावसाहेब दानवे मदत केली असल्याने ते त्यांच्या मुलास महाविकास आघाडीला मतदान करायला सांगतील, असेही विधान त्यांनी माध्यमांमध्ये केले. एका बाजूला दानवे यांच्यावर उपकार करतो आहोत असेही सांगायचे आणि त्याच वेळी त्यांच्या विरोधात उमेदवार म्हणून खोतकर यांचेही नाव जाहीर करायचे अशी परस्परविरोधी विधाने राज्यमंत्री सत्तार करत आहेत. माध्यमांमध्ये ते करत असलेली विधाने शिवसेनेमध्ये कोणी फारसे गांभीर्याने घेत नाहीत, असेच वातावरण होते. पण जालना लोकसभेत लक्ष घालणार असे ते जाहीर सभेतील भाषणात म्हणाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

दुसरीकडे खोतकर यांनी दानवे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवावी या सत्तार यांच्या मताला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही साथ दिली. अर्जुन खोतकरांनी रावसाहेबांना पराभूत करण्यासाठी निवडणूक लढवावी असा आग्रह करताना चंद्रकांत खैरे यांनी रागाचे कारणही बुधवारी स्वाभिमान सभेत स्पष्ट केले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना पराभूत करण्यासाठी रावसाहेब दानवे यांनी जावई हर्षवर्धन जाधव यांना मदत केली. ऐन निवडणुकीत ते तेवढ्यासाठी ते रुग्णालयातही दाखल झाल्याचा आरोपही त्यांनी जाहीर सभेतून केला. त्या जुन्या रागापोटी रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरावे अशी चर्चा पेरण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीचे उमेदवार ठरविण्याचे अधिकार आपल्याकडे असल्यागत जाहीरपणे खोतकर यांच्या नावाची चर्चा शिवसेना नेते कशा पद्धतीने स्वीकारतात, याचे औत्सुक्य जालना व औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आहे.

Story img Loader