राजेश्वर ठाकरे

उत्तर प्रदेशचे इमरान खान ऊर्फ प्रतापगडी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी दिल्याने नाराजी व्यक्त करीत प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा देणारे माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांचा पिंडच पक्ष नेतृत्वाला आव्हान देण्याचा असल्याचे त्यांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीवरून दिसून येते. आताही पक्षनेतृत्वाला आव्हान देत नाराजीनामा देण्याची व त्यातून प्रसिद्धीच्या झोतात येण्याची परंपरा आशीष देशमुख यांनी कायम राखली आहे.

माजीमंत्री व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुख यांचे पुत्र असलेले डॉ. आशीष देशमुख उच्चशिक्षित आहेत. वडील काँग्रेसचे नेते असले तरी त्यांची राजकीय कारकीर्द भाजपमधून सुरू झाली. २०१४ मध्ये त्यांना भाजपने त्यांचे काका व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याविरुद्ध काटोल विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. अनिल देशमुखांचा पराभव करून प्रथमच विधानसभेची पायरी चढलेल्या आशीष देशमुख यांनी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले होते. पण भाजपच्या संस्कृतीत ते रुळले नाही.

पक्षात महत्त्व दिले जात नसल्याने अस्वस्थ आशीष देशमुख यांनी २०१८ मध्ये स्वतंत्र विदर्भाचा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करत विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपला रामराम ठोकला. नंतर त्यांनी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या उपस्थितीत वर्धा येथे एका कार्यक्रमात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये आल्यावर त्यांनी २०१९ च्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले. परंतु ते सफल झाले नाही. परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नागपुरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पक्षाने त्यांना थेट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवारी दिली. देशमुख यांना ऐनवेळी उमेदवारी मिळूनही त्यांनी फडणवीस यांना जोरदार टक्कर दिली होती. फडणवीस यांना ५० हजार पेक्षा कमी मताधिक्क्याने ही निवडणूक जिंकता आली.

काँग्रेसमध्येही देशमुख यांना पक्षांतर्गत गटबाजीला तोंड द्यावे लागले. जिल्ह्यात देशमुख विरुद्ध केदार वादाला देशमुखांच्या काँग्रेस प्रवेशाने पुन्हा उजळणी मिळाली. जिल्हा बँक घोटाळ्याच्या जुन्या मुद्यावरून देशमुख यांनी स्वपक्षीय मंत्री सुनील केदार यांच्या राजीनाम्याची मागणी करून खळबळ उडवून दिली होती. आता राज्यसभेच्या उमेदवारीवरून थेट सोनिया गांधी यांना राजीनामा पाठवून त्यांच्या कार्यपद्धीवर टीका केली आहे. एकूणच राजकारणाकडे बघण्याचा या युवा नेत्यांचा दृष्टिकोन धरसोडीचा असल्याचे त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीवरून दिसून येते.

Story img Loader