त्रिपुरामधील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आगरतळा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुदीप रॉय बर्मन यांचा विजय झाला आहे. नुकतेच स्वगृही परतलेल्या बर्मन यांच्यासाठी हा विजय अत्यंत महत्वाचा होता. मूळचे काँग्रेमध्ये असणाऱ्या बर्मन यांनी २०१८ साली भाजपाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. आता पोटनिवडणुकीत ही जागा राखण्यात त्यांनी यश मिळवले आहे. नुकतीच त्रिपुरामध्ये चार विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपाचा फक्त आगरतळा या मतदार संघात पराभव झाला आहे.५६ वर्षांचे सुदीप रॉय बर्मन हे सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. बर्मन यांनी आपली राजकीय कारकीर्द काँग्रेससोबत सुरू केली. त्यांनी २०१६ मध्ये काँग्रेसचा राजीनामा देऊन तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पण तृणमूल कॉंग्रेसमध्ये त्यांचे मन फार रमले नाही. २०१७ मध्ये तृणमूल काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आणि आता फेब्रुवारी २०२२ मध्ये ते पुन्हा भाजपाला सोडचिट्ठी देऊन मूळ काँग्रेस पक्षात परतले. भाजपा सोडल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे आगरतळा या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा