सुहास सरदेशमुख
छत्रपती संभाजीनगर : सकल हिंदू जनजागरण मोर्चाच्या वतीने रविवारी ( १९ मार्च) होणाऱ्या आंदोलनात बाहेरगावाहून प्रक्षोभक भाषणे करणाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मुळे गेली १४ दिवस सुरू असणारे नामांतर विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन स्थगित करण्याची घोषणा खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी रात्री केली.
रविवारच्या मोर्चासाठी अधिकाधिक संख्येने एकत्र जमण्याचे आवाहन हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. १४ व्या दिवशी एमआयएमच्या वतीने आंदोलनास स्थगिती दिल्यामुळे दोन समाजातील संघर्ष टळेल, असा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, या सकल हिंदू संघटनांच्या आंदोलनाच्या नियोजनापासून ठाकरे गट चार हात दूर असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा… विरोधकांच्या एकजुटीचे भाजपपुढेच आव्हान
हेही वाचा… शिंदे गटातील प्रवेशावर परिणाम ?
शहराचे नाव छत्रपतीसंभाजीनगर करण्यात आल्यानंतर नामांतर विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. खासदार इम्तियाज जलील यांनी या आंदोलनाचे नियोजन आणि अंमलबजावणी केली. गेल्या काही दिवसापासून निदर्शन करण्यास येणाऱ्या तरुणांची संख्याही कमी झाली होती. शुक्रवारी सायंकाळी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन शहरात अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती खासदार जलील यांनी दिली. प्रक्षोभक भाषणांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या काही नेत्यांना आमंत्रित करण्यात आले असून त्यामुळे शहरातील वातावरण खराब होईल. त्यामुळे पोलिसांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहनही खासदार जलील यांनी केले. ‘ गेली १४ दिवस सुरू असणाऱ्या आंदोलनातून नामांतरास विरोध असल्याचा संदेश दिला असून या निर्णयाच्या विरोधात न्यायालयीन लढाई कायम राहील ’ असे खासदार जलील यांनी जाहीर केले. सकल हिंदू संघटनांच्या वतीने आयोजित आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ प्रपत्र भरुन घेतले जाणार आहेत.