उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर करण महारा यांनी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळली. दोन वेळा आमदारकी भूषविलेल्या महारा यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज्यात जातीय तेढ वाढल्याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच अग्निपथ योजनेच्या विरोधात काँग्रेस पक्ष का उभा राहिला आहे आणि उत्तराखंडमध्ये पक्ष संघटन बळकट करण्यासाठी कोणते प्रयत्न केले जाणार आहेत? यासारख्या अनेक प्रश्नांना महारा यांनी उत्तर दिले.
प्रश्न : राज्यातील नेत्यांनी नुकतीच दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची भेट घेतली, यावेळी काय चर्चा झाली?
भाजपाने अग्निपथ योजना आणून लष्कराच्या इतक्या वर्षांच्या रचनेलाच धक्का दिला आहे. काँग्रेस पक्षाला या योजनेबद्दल साशंकता वाटते. ही योजना आपल्या रेजिमेंटला धोका निर्माण करणारी आहे. उत्तराखंडमधील लोकांनी भारतीय लष्करात मोठे योगदान दिले आहे. यासाठी उत्तराखंडमधील जनतेसाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. यासोबतच २०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीबाबतही आम्ही चर्चा केली आणि त्यावेळी केलेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत. राहुल जी आणि मल्लिकार्जुन खरगे जी यांनी एक नवीन उपक्रम सुरू केला असून प्रत्येक राज्याच्या संघटनेला एक-एक दिवस देऊन त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जात आहेत. त्यामुळे आमचे प्रश्न सुटतील, अशी आम्हाला खात्री वाटत आहे.
प्रश्न : राहुल गांधी सप्टेंबर महिन्यात राज्याचा दौरा करणार आहेत का आणि यात्रेचे वेळापत्रक काय आहे?
बागेश्वर मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होणार असून पक्षाचे नेते त्या मतदारसंघात व्यस्त आहेत. पोटनिवडणुकीनंतर आम्ही ४५ ते ६० दिवसांच्या यात्रेचे आयोजन करणार आहोत. त्यातून आम्ही अग्निपथ योजनेचा मुद्दा जनतेपुढे मांडणार आहोत, तसेच महिलांवर होणारे अत्याचार आणि बेरोजगारीसारखे मुद्द्यांवर जनतेचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासोबतच महागाई, केदारनाथ येथील सोन्याचा भ्रष्टाचार आणि जोशीमठ येथील परिस्थितीबाबत लोकांमध्ये जागृती करणार आहोत. राहुल गांधी यांनी किमान १० दिवसांसाठी यात्रेत सहभागी व्हावे, अशी आमची विनंती असणार आहे.
प्रश्न : उत्तराखंडच्या माध्यमातून काँग्रेस देशव्यापी संदेश देऊ पाहत आहे का?
हो हे खरे आहे. उत्तराखंडमध्ये लोकसभेच्या फक्त जागा असल्या तरी अग्निपथ योजनेचा विषय महत्त्वाचा असल्याचा संदेश आम्ही देत आहोत. भाजपाच्या एका माजी नेत्याच्या मुलाने हॉटेल रिसेप्शनिस्टला (अंकिता भंडारी प्रकरण) अतिमहत्त्वाच्या लोकांना ‘विशेष सेवा’ देण्यास भाग पाडल्याचा आरोप झालेला आहे. संपूर्ण देशाला प्रश्न पडला आहे की, ते अतिमहत्त्वाचे लोक कोण आहेत? आम्ही हे सर्व विषय उचलून धरू.
हे ही वाचा >> उत्तराखंडची जन्मकथा, …’उत्तर’कळा मात्र अद्यापही सुरूच!
प्रश्न : उत्तराखंडमध्ये जातीय तणाव वाढत आहेत, याकडे तुम्ही कसे पाहता?
आम्ही भारत जोडो यात्रा आणि इतर माध्यमातून वारंवार याबाबत बोलत आहोत. मतांसाठी भाजपा कशी द्वेषाची पेरणी करत आहे, हे आम्ही लोकांना सांगत आहोत. एवढा जातीय तणाव आम्ही यापूर्वी कधीही पाहिला नव्हता, पण आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. पुरोला येथे जातीय विखार पसरविणारा व्यक्तीच देहरादून येथेही द्वेषपूर्ण भाषण देतो. तेव्हापासून एकही गुन्हा दाखल केलेला नाही. लोक खुलेआम अल्पसंख्याकांचा छळ करत आहेत, त्यांना मारण्याची धमकी देत आहेत आणि पोलीस व प्रशासन मूकपणे हे पाहत आहे. यातून त्यांचा (भाजपा) अजेंडा दिसून येतो.
प्रश्न : उत्तराखंडच्या समान नागरी संहितेबाबत काँग्रेसची भूमिका काय आहे?
भोटिया, थारू आणि बुक्सा यासारख्या आदिवासी जमातींना संविधानाने विशेष अधिकार दिलेले आहेत. जेव्हा अनेक संस्थानांचे मिळून आपले एक राष्ट्र निर्माण झाले, तेव्हा काही अटी घालण्यात आल्या होत्या. त्यात आदिवासी जमातींसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. काँग्रेस त्या अधिकारांच्या बाबतीत प्रश्न विचारते, तेव्हा भाजपाकडे त्याचे उत्तर नसते.
प्रश्न : पण जेव्हा तज्ज्ञांच्या समितीने सर्व पक्षांना अभिप्राय नोंदविण्याची विनंती केली होती, तेव्हा काँग्रेसने सहभाग का घेतला नाही?
तज्ज्ञ समितीची भेट घेण्यासाठी भाजपा आम्हाला आदेश देऊ शकत नाही. जेव्हा समितीने आम्हाला बैठकीसाठीचे निमंत्रण दिले, तेव्हा आम्ही त्यांना दोन पत्रे पाठवून लोकांच्या सूचना आणि ढोबळ मसुद्यासह अहवालाच्या प्रती द्याव्यात अशी विनंती केली. पण त्यांनी त्यासाठी नकार दिला. आम्ही काहीही न वाचता फक्त ङो म्हणावे, अशी त्यांची इच्छा आहे. मसुदा वाचल्यानंतरच आम्ही आमची भूमिका जाहीर करू. जर मसुदा राष्ट्राच्या हिताचा असेल तर त्याला विरोध करण्याचा कोणताही प्रश्न येत नाही. पण जर यातून केवळ हिंदू-मुस्लीम विचार मांडला जाणार असेल आणि लोकांचे अधिकार हिसकावून घेतले जात असतील तर आम्ही हे सहन करणार नाही.
आणखी वाचा >> समान नागरी कायद्याद्वारे लोकसंख्येवर नियंत्रण? सर्व समस्यांचे मूळ लोकसंख्या वाढ – भाजपा खासदारचे मत
प्रश्न : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनीती काय आहे?
आम्ही बुथ स्तरावरून कामाला सुरुवात केली आहे. आमचे नेते प्रत्येक महिन्याला किमान तीन कार्यक्रम घेत आहेत. आम्ही भाजपावर तुटून पडत आहोत आणि लोक आम्हाला प्रतिसाद देत आहेत. राज्यातील पाचही लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रश्न : भाजपाचा सामना करण्यासाठी काय योजना आहेत?
आम्ही स्थानिक मुद्द्यांना अधिक महत्त्व देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घटक आम्ही नाकारत नाहीत. पण पूर्वी जो करीष्मा होता, तो आता राहिलेला नाही. आज मणिपूर हिंसाचारानंतर मोदी यांचे मौन लोक पाहत आहेत. शेतकरी आंदोलनादरम्यान ७०० जणांचा मृत्यू झाला, त्यावरही ते शांत होते. त्यांच्या मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली. दुसऱ्या एका मंत्र्याने दिवसाढवळ्या लोकांना मारहाण केली. त्यांचा खासदार आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंचा विनयभंग करतो. या सर्व प्रकरणात एकावरही कारवाई करण्यात आलेली नाही.
काँग्रेस आणि भाजपामधील मतदानाच्या टक्केवारीचा फरक पाहाल तर तो केवळ सात ते आठ टक्क्यांच्या आसपास आहे. भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही आणि यावेळी त्यांच्या १५० जागांमध्ये घट झालेली पाहायला मिळेल.