Yogi Adityanath on Chhatrapati Shivaji Maharaj: उत्तर प्रदेशमधील भाजपा सरकारला आठ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आग्रा येथे वर्धापन दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात बुधवारी बोलत असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्र्याचा सांस्कृतिक वारसा आणि आग्र्याची ओळख ब्रजभूमीशी निगडित असल्याचे सांगितले. तसेच वृंदावन बिहारी लाल आणि राधा रानी यांचाही आग्र्याशी घनिष्ठ संबंध असून ही भारतीय संस्कृती असल्याचे ते म्हणाले. आग्रा आणि मुघलांचा काहीही संबंध नसल्याचेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
आग्रा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा संबंध
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, आग्र्याचा इतिहासाशी संबंध जोडायचा असेल तर तो मुघलांशी नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडला गेला पाहिजे. आग्र्याच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
या कार्यक्रमात बोलत असताना योगी आदित्यनाथ यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच योजनेच्या लाभार्थ्यांशीही संवाद साधला. याठिकाणी लोक कल्याणकारी योजनांची माहिती देणारे प्रदर्शनही भरविण्यात आलेले आहे. तसेच ६३५ कोटी रुपयांच्या १२८ योजनांचे भूमिपूजन केले. तसेच उत्तर प्रदेशच्या कामगिरीचे वर्णन करणारी ‘एक झलक’ ही डॉक्युमेंट्रीही दाखविण्यात आली.
मुघल वस्तूसंग्रहालयावर प्रश्नचिन्ह
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, मागील सरकारने आग्रा येथे एका वस्तूसंग्रहालयाची निर्मिती सुरू केली होती. त्याचे नाव मुघल वस्तूसंग्रहालय असे ठेवण्यात आले होते. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, मुघलांचा आग्र्याशी काय संबंध? आम्ही या संग्रहालयाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज असे केले.
अराजकतेची करून दिली आठवण
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २०१७ पर्यंत असलेल्या समाजवादी पक्षाच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मागील सरकारच्या काळात राज्यात अराजकता पसरली होती. ज्यांचे वय २५ हून अधिक आहे. त्यांना २०१७ च्या आधी राज्यातील परिस्थिती माहीत असेल. त्यावेळी राज्यात गुंडाराज, माफियागिरी यांची चलती होती. तरूणांसमोर संकट होते, शेतकरी आत्महत्या करत होते, गरीब उपासमारीने मरत होते, व्यापारी आणि मुली सुरक्षित नव्हत्या. सण-उत्सवाच्या आधी लोकांच्या मनात भीती असायची, नेहमी दंगली उसळत आणि त्यामुळे कर्फ्यू लावला जात असे.
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, २०१७ आधी राज्यात रस्त्यांवर खड्डे होते. सायंकाळ होताच रस्त्यांवर अंधार व्हायचा. उत्तर प्रदेश आणि दंगल असे समीकरणच बनले होते. आज तेच लोक राज्यात अपप्रचार करण्याचे काम करत आहेत.