सुहास सरदेशमुख
औरंगाबाद: अशोक चव्हाण , देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात या नेत्यांची कधी स्तुती करायची तर संधी मिळेल तेव्हा त्यांच्यावरच टीका करायची ही अब्दुल सत्तार यांची कार्यशैली. आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचा नेता अशी ओळख निर्माण करत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपले वादग्रस्त रिंगण कृषी आयुक्तालयापर्यंत विस्तारले. कृषी आयुक्त पदी औरंगाबाद येथील त्यांचे आवडते अधिकारी सुनील चव्हाण यांची निवड करुन घेतली आणि सिल्लोड येथील कृषी व क्रीडा महोत्सवसात तिकिटांच्या माध्यमातून नवी ‘ महसुली’ सुरू केली. त्यामुळे वादात सापडलेल्या अब्दुल सत्तार यांनी सोमवारी आयोजित केलेली पत्रकार बैठक रद्द केली. पण सत्तार आणि वाद हे गणित आता महिन्यातून दोनदा माध्यमांमधून सामोरे येऊ लागले आहेत.
जालना लोकसभा मतदारसंघा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना मदत होते म्हणून सत्तार आणि दानवे यांची राजकीय मैत्री सर्वश्रुत आहे. एरवी दानवे यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत असे दाखवित अर्जून खोतकर यांच्याशीही सत्तार यांचे राजकीय मैत्र आहेच. निवडणुका जिंकता येतील म्हणून अगदी भाजपच्या प्रचार गाडीत चढण्याची तयारी असणारे सत्तार हे नेहमीच वादात सापडलेले असतात. त्यांना जमीन प्रकरणात या पूर्वीही न्यायालयाने फटकारले आहे. पण कृषी आयुक्तालयामार्फत निधी गोळा करण्यासाठी केलेले प्रयत्न नव्याने अंगलट येण्याची शक्यता दिसू लागली आहे. फोडाफोडीच्या राजकारणात अब्दुल सत्तार जणू अपरिहार्य ठरत आहेत का, असा प्रश्न निर्माण होईल असे सध्याचे वातावरण आहे.
हेही वाचा: राजकारण असतं कसं ? रावसाहेब दानवे सांगतात तेव्हा…..
ज्या पक्षात असू त्या पक्षातील सर्वोच्च पदावरील नेत्याची स्तुती करायची, ते मतदारसंघात आले की त्यांच्यावर फुलांनी उधळण करायची, त्यांच्यासमोर गर्दी दाखवायची, त्यातून लाभ मिळवायचा आणि वेळ पडतीलच तर नेतृत्वावरही टीका करायची, ही मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांची राजकीय कार्यशैली. एखादे प्रकरण विरोधात जाईल, असे लक्षात आले की माध्यमांमध्ये हसून त्याचे गांर्भीय घालवून टाकायचे, या वृत्तीमुळे नेहमी वादग्रस्त ठरणाऱ्या अब्दुल सत्तार यांना एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळात स्थान दिले. रामराम, सलाम, जयभीम, जय हिंद, जय महाराष्ट्र असे एका दमात म्हणणारे सत्तार यांचा सिल्लोड मतदारसंघ मात्र बांधलेला असल्याने कुत्रा चिन्ह दिले तरी निवडून येऊ असे ते म्हणाले होते. वृत्तीमधील बेदरकारपणा एवढा की, सारे अवघड प्रश्न ते हसून टाळतात.
टीईटी घोटाळयाच्या पार्श्वभूमीवर आमदार सत्तार यांना मंत्रीमंडळात स्थान मिळेल की नाही या वरुन चर्चा सुरू असताना त्यांनी महसूल राज्यमंत्री म्हणून काम करताना केलेल्या चुकांची यादीही आवर्जून सांगण्यात येत आहे. सत्तार यांना उच्च न्यायालयाने दोन प्रकरणात फटकारले होते. मात्र, त्याचा सत्तार यांच्या राजकीय कारकीर्दीवर त्याचा परिणाम झाला नव्हता. तो ‘टीईटी’ प्रकरणानंतरही झाला नाही.
खरे तर अब्दुल सत्तार हे नेहमी वादग्रस्त राहिले आहेत. कार्यकर्त्याला लाथांनी मारहाण केली म्हणून त्यांचे मंत्रीपद गेले होते. कॉग्रेसमध्ये असताना अशोकराव चव्हाण यांनी सत्तार यांना बळ दिले.
हेही वाचा: अजित पवार का चिडतात ?
कॉग्रेस पक्षातील निर्णय आणि सरकारचे निर्णय आपल्याच बाजूने व्हायला हवेत यासाठी कमालीची आग्रही असणाऱ्या सत्तार यांना औरंगाबादचे तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बरेच रोखून धरले होते. त्यामुळेच त्यांनी एका बैठकीत थोरात यांच्यावर टीका केली. पुढे राधाकृष्ण विखेपाटील हे त्यांच्या टीकेच्या केंद्रस्थानी होते. कॉग्रेसचे सत्तेत येण्याचे गणित बिघडलेले असल्याचे लक्षात आल्यानंतर पक्ष बदलण्याचे चातुर्य सत्तार यांच्याकडे होते. या काळात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची कमालीची स्तुती केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काढलेल्या प्रचार यात्रेच्या बसमध्येही ते चढले. पण त्यांनी शिवसेनेत जावे असा सल्ला तेव्हा भाजपकडून देण्यात आला. पुढे त्यांनी ‘शिवबंधन’ बांधले. शिवसेनेत त्यांना मंत्री पद मिळाले. या कालावधीमध्ये प्रशासकीय यंत्रणेवर आपलीच पकड असावी अशी रचना त्यांनी करुन घेतली. वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्येही आपला शब्द प्रमाण मानला जावा, यासाठी त्यांनी खाशी मेहनत घेतली.
हेही वाचा: उत्तर महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादीला बळ; शिंदे गटाचीही मुसंडी
कॉग्रेस, शिवसेना, भाजपा मित्र आणि बाळासाहेबांची शिवसेना असा राजकीय प्रवास करणारे सत्तार यांची कार्यशैली कितीही वादग्रस्त ठरली तरी त्यांना दरवेळी मिळणारे अभय ही राजकीय अपरिहार्यता आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीकडून सत्तार यांना विधिमंडळात घेरण्यात आले आहे. त्यामुळे नव्या वादाचा गुंत्यात ते गुरफटतात का, यावरुन तर्कवितर्क लढविले जात आहेत.