नाशिक : कर्ज घेतल्यानंतर तुम्ही पाच-दहा वर्ष ते माफ होण्याची वाट बघता…कर्जमाफीची रक्कम आल्यानंतर एक रुपये तरी शेतीत गुंतवणूक करता का ?…विम्याचे वा अन्य पैसे मिळाले की साखरपुडा, लग्न उरकतात…शेतकऱ्यांना उद्देशून केलेल्या अशा विधानांमुळे कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे हे पुन्हा वादात सापडले आहेत. बेधडक विधानांची ही त्यांची पहिलीच वेळ नाही. अनेकदा असे वक्तव्य करुनत त्यांनी वाद ओढवून घेतले आहेत. कोकाटे आणि वादग्रस्त विधाने हे जणू समीकरण झाले आहे.

अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. माडसांगवी येथील द्राक्षबागांची पाहणी करताना कर्जमाफीच्या मुद्यावरून कृषिमंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावले. प्रसार माध्यमांसमोर जास्त बोलता येणार नाही, हे स्पष्ट करत त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधलेला संवाद वादात सापडला आहे. राष्ट्रवादीचे (अजित पवार) मंत्री असणारे ॲड. कोकाटे हे पक्षांतर आणि बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. पक्षाने माजीमंत्री छगन भुजबळांना डावलून त्यांना मंत्रिपद दिले. मात्र त्यांच्या आक्रमकतेत बदल झालेला नाही.

मध्यंतरी अमरावती दौऱ्यात एक रुपयात पीक विमा योजनेविषयी मार्गदर्शन करताना कोकाटेंनी ‘भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही’ असे त्यांनी म्हटले होते. एक रुपयात पीक विमा योजनेचा काहींनी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्वीय सहायक नेमणुकीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच दिवशी दम दिल्याची बाबही त्यांनी सहजपणे कथन केली होती. आमचे स्वीय सहायक (पीएस) आणि विशेष अधिकारी (ओएसडी) मुख्यमंत्रीच ठरवतात. त्यामुळे आमच्या हाती काहीही राहिले नाही, असे त्यांनी सूचित केले होते.

राजकीय जीवनात जवळपास सर्वच पक्षात कोकाटेंचा प्रवास झाला आहे. आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी कितीही पक्षांतरे करण्यास तयार आहोत, अशी त्यांची त्यावर भूमिका असते. त्यामुळे कृषिमंत्रीपदी नियुक्तीनंतर सर्वपक्षीयांच्यावतीने नाशिकमध्ये त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणीही ते शांत बसले नाहीत. कधीकाळी काँग्रेसचे तिकीट आणले की, लोक आपोआप आमदार व्हायचे. आज तसे भाजपचे झाले. परंतु, आपण त्यास अपवाद ठरलो. सगळीकडे निवडून आलो, मात्र भाजपमधून लढलो, तेव्हा हरलो. हा पक्ष आपल्यासाठी भाग्यवान नसल्याने सोडून दिल्याचे त्यांनी म्हटले होते. काही वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना दैवत मानणारे कोकाटे हे नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इतके जवळ गेले की, त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. अलीकडेच बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात झालेल्या शिक्षेमुळे त्यांची आमदारकी धोक्यात आली होती. न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे हे संकट तूर्तास टळले. मात्र, वादग्रस्त विधानांची कोकाटेंची मालिका कायम आहे.