विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये राजकीय घडमोडींना वेग आला आहे. गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात असताना आता आप अर्थात आम आदमी पार्टीनेदेखील या निवडणुकीत उडी घेतली आहे. आप पक्षाकडून मागील काही दिवसांपासून येथे जोमात प्रचार केला जात आहे. असे असताना आता आपने गुजरातमध्ये ‘तुम्हीच तुमचा मुख्यमंत्री निवडा’ ही मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा >>>> SRA Scam : “सत्ता असली म्हणून काहीही करायचं का?” पेडणेकरांच्या टीकेनंतर आता सोमय्यांचे जशास तसे उत्तर; म्हणाले “मुंबईकरांना लाज…”
या मोहिमेवर अरविंद केजरीवाल यांनी अधिक माहिती दिली आहे. “गुजरातच्या लोकांनीच त्यांचा मुख्यमंत्री कोण असावा, याची निवड करावी, असे आम्हाला वाटते. त्यासाठी आम्ही एक दुरध्वनी क्रमांक आणि एक ई-मेल आयडी देत आहोत. या मेल आणि दुरध्वनी क्रमांकावर गुजरातच्या नागरिकांनी आपले मत नोंदवावे. ३ नोव्हेंबरपर्यंत हे मत नोंदवण्याची मुदत असेल. गुजरातमधील जनतेला कोण मुख्यमंत्री हवा आहे, याची घोषणा आम्ही पुढच्या दिवशी करू,” असे अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.
हेही वाचा >>>> छठपुजेच्या व्यवस्थेसाठी राजकीय पक्षांची धावपळ; केंद्र सरकारकडून २५० विशेष रेल्वे, तर ‘आप’तर्फे दिल्लीत पुजेसाठी ११०० ठिकाणी व्यवस्था
गुजरातच्या विकासासाठी भाजपाकडे दृष्टी नाही. भाजपाने गुजरातमधील लोकांना फक्त बेरोजगारी आणि भाववाढ देण्याचे काम केले आहे. या दोन बाबतीत गुजरात राज्य सर्वोच्च स्थानावर आहे. मात्र आता बदल घडवण्याची वेळ आली आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये आप पक्षाने जे काम केलेलं आहे, त्याची चर्चा गुजरातमधील लोकदेखील करत आहेत, असेही केजरीवाल म्हणाले आहेत.
हेही वाचा >>>> ‘भारत जोडो’ नंतर गुजरातमध्ये काँग्रेसची ‘परिवर्तन संकल्प यात्रा’; तीन दशके सत्तेत असलेल्या भाजपाची चिंता वाढणार?
दरम्यान, आप पक्षाने पंजाब राज्यातही तुमचे पुढचे मुख्यमंत्री कोण असावेत याबाबत लोकांचे मत जाणून घेतले होते. त्यानंतर आपकडून हीच प्रक्रिया गुजरातमध्येही राबवली जात आहे. राजकीय जाणकारांनुसार गुजरातमध्ये आप पक्ष काँग्रेस आणि भाजपाला आव्हान ठरण्याची शक्यता आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम अद्याप घोषित झालेला नाही.