चंद्रशेखर बोबडे

नागपूर : सलग पंधरा वर्षांपासून महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपला आगामी निवडणुकीत धूळ चारण्यासाठी काँग्रेसने एकजुटीने कामाला लागण्याची गरज असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर या पक्षात शहर अध्यक्षपदाच्या वादाने तोंड वर काढले आहे. हा वाद आता थेट दिल्ली दरबारी पोहोचला आहे.

शहर काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांना त्यांच्या पदावरून दूर करा, अशी मागणी करण्यासाठी पक्षाचे काही नेते दिल्लीवारी करून आले. त्यामुळे हा वाद इतक्यात मिटेल याची शक्यता नाही.

काँग्रेसच्या जयपूर अधिवेशनात अनेक वर्षांपासून एकाच पदावर असणाऱ्यांना पायउतार करण्याचा ठराव झाला होता. त्यानुसार अनेक वर्षांपासून शहर अध्यक्ष असणाऱ्या विकास ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला. मात्र पटोले यांनी राजीनामा न स्वीकारता ठाकरे यांनाच पुन्हा काम पाहण्यास सांगितले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवीन अध्यक्ष नेमल्याने नियोजनात अडचणी येतील त्यामुळे ठाकरे यांच्याकडेच शहर काँग्रेसची सूत्रे राहणे योग्य असल्याचा युक्तिवाद त्यावेळी पटोले यांनी केला होता. खुद्द प्रदेशाध्यक्षांचाच निर्णय असल्याने ठाकरे विरोधी गटानेही असहमती दर्शवली नव्हती.

हेही वाचा… संघटनात्मक बांधणीसाठी भाजपाची ‘लोकसभा प्रवास योजना’

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोंडीची माहिती एका क्लिकवर…

मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर चित्र पालटले. पक्षातील ठाकरे विरोधकांनी पुन्हा ठाकरे हटाव मोहीम हाती घेतली. महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्यासह काही माजी नगरसेवक व माजी आमदारांसह काही नेत्यांनी दिल्लीत जाऊन ठाकरे हटाव ही मागणी लावून धरली. अ.भा. काँग्रेसने एखादा निर्णय घेतलेला असेल तर त्यात बदल करण्याचा अधिकार प्रदेश काँग्रेसला नाही. त्यामुळे ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारून नवा अध्यक्ष देणे अपेक्षित आहे. हीच बाब दिल्लीतील नेत्यांना सांगितल्याचे ठाकरे विरोधी गटाच्या नेत्यांनी त्यांच्या दिल्लीवारीचे कारण स्पष्ट करताना सांगितले. दुसरीकडे विकास ठाकरे यांना ही बाब मान्य नाही. पक्षाच्या धोरणानुसारच आपण शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता व प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसारच पुन्हा ही जबाबदारी स्वीकारली. पण काही असंतुष्ट पक्षात जाणीवपूर्वक गटबाजीला प्रोत्साहन देत आहे, असे ठाकरे यांचे या वादावर म्हणणे आहे.

या पक्षांतर्गत वादाचा परिणाम महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे यांच्या नेतृत्वात शहर काँग्रेसने एक वर्षापासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पण आता शहराध्यक्षाच्या विरोधातच मोर्चेबांधणी सुरू झाल्याने कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. महापालिका निवडणुकीसाठी तिकीट वाटपात शहर काँग्रेस अध्यक्षांची असणारी महत्त्वाची भूमिका हे या वादाचे प्रमुख कारण मानले जाते. शहरात ठाकरे विरुद्ध माजी मंत्री नितीन राऊत असे दोन गट पक्षात आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्यातरी ठाकरेंच्या बाजूने असल्याने राऊत यांनी दिल्लीत प्रयत्न सुरू केले आहेत.

Story img Loader