महाराष्ट्र, बिहार या राज्यांत मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रात सत्तांतर होऊन ४० दिवस झाले आहेत. तर बिहारमध्ये नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन भाजपाची साथ सोडली आहे. देशपातळीवर या घडामोडी घडत असताना त्रिपुरा राज्यातही तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. येथील बडे नेते बाप्तू चक्रवर्ती यांनी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. चक्रवर्ती यांच्यासोबतच तृणमूलच्या अनेक कार्यकर्त्यांनीदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. असे असताना चक्रवर्ती यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे तृणमूल काँग्रेससाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा >>> “बदनामी करणाऱ्यांना समोर…” मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सत्तारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
बाप्तू चक्रवर्ती यापूर्वी काँग्रेस पक्षामध्येच होते. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात युवा काँग्रेसपासून केलेली आहे. त्यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला होता. नंतर भाजपामूधन तृणमूल काँग्रेस आणि आता पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे. काँग्रेस पक्षात प्रवेश करताना त्यांनी भाजपा तसेच तृणमूल काँग्रेसवर कठोर टीका केली आहे. “खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेस हा पक्ष भाजपाचा सामना करणारा सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नात सामील होण्यासाठी मी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी प्रतिक्रिया चक्रवर्ती यांनी दिली आहे. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार तृणमूल काँग्रेस. मार्क्सवादी कम्यूनिष्ट पार्टी, भाजपा आणि इतर पक्षांचे सुमारे २५१७ कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
हेही वाचा >>> महाराष्ट्रात ‘शतप्रतिशत’चा भाजपाचा प्रयत्न, शिंदे गटाशी युती करून डोळे २०२४च्या निवडणुकीवर!
तर दुसरीकडे बाप्तू चक्रवर्ती यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या साधारण ५० राज्यपातळीवरील नेत्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्याचा दावा केला आहे. तसेच बाप्तू चक्रवर्ती यांनी तृणमूल पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली असली तरी “पक्षात कोणताही अंतर्गत वाद नाही. काँग्रेसने लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कोणीही कोणत्याही पक्षात सामील होऊ शकतो. तो संबंधित व्यक्तीचा निर्णय असतो. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकारिणीचे सदस्य देबू घोष यांनीदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा दावा केला जात आहे. मात्र ते अद्याप तृणमूल पक्षात असून त्यांनी दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही,” अशी प्रतिक्रिया तृणमूलचे ज्येष्ठ नेते राजीव बॅनर्जी दिली.
हेही वाचा >>> “घटनेचा निषेध म्हणून…” संजय राठोडांना मंत्रिपद मिळल्यानंतर शिवसेनेच्या सुषमा अंधारेंचे चित्रा वाघ यांना खुले आव्हान
जून महिन्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला होता. या निवडणुकीत कृणमूलला ३ टक्के मतं मिळाली होती. यावेळी जनाधार घटल्यामुळे तृणमूल काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. येथे एकूण ४ जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. यातील ३ जागा या भाजपा तर एक जागा काँग्रेसने जिंकली होती.
हेही वाचा >>> “ज्यांचे नेते जेलमध्ये…” मंत्रिमंडळ विस्तारावरून राष्ट्रवादीने केलेल्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा >>> “ते त्यांचं वैयक्तिक मत,” संजय राठोडांच्या मंत्रिपदाला चित्रा वाघ यांच्या विरोधानंतर भाजपाच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया
तर दुसरीकडे मागील वर्षी शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तृणमूलला एकूण १६.३९ टक्के मते मिळली होती. तर अगरतळा महानगरपालिका निवडणुकीत हा पक्ष दुसऱ्या स्थानी होता. या यशानंतर भाजपाला विरोध करणारा प्रमुख पक्ष आम्हीच आहोत, असा दावा तृणमूलने केला होता.
दरम्यान, बाप्तू चक्रवर्ती यांच्या निर्णयानंतर येथे तृणमूलमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र “आम्ही आमचे नेते आणि समर्थकांच्या संपर्कात आहोत. आमच्याकडे पक्षत्याग कोणीही करणार नाही. संविधानाचे रक्षण करण्यासाठी तसेच भाजपाविरोधात लढा उभारण्यासाठी आम्ही सर्व सोबत आहोत,” असा विश्वास राजीव बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे. तसेच पक्षांतर केलेल्या बाप्तू चक्रवर्ती यांच्यावर त्यांनी टीका केली आहे. “चक्रवर्ती हे न पटणारी कारणं देत आहेत. त्यांना तृणमूल काँग्रेसमध्ये सरचिटणीसपद देण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी त्यांनी पक्षाच्या एका कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता. आज ते तृणमूल हा पक्ष भाजपाची बी टीम असल्याचा आरोप करत आहेत. हे एक निमित्त आहे,” असेही बॅनर्जी म्हणाले.