नगर : नगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे सुजय विखे व महाविकास आघाडीचे निलेश लंके या दोन उमेदवारांमध्ये होणारी लढत ही विखे विरुद्ध लंके अशी प्रत्यक्षात न होता ती शरद पवार विरुध्द राधाकृष्ण विखे अशा दोन पारंपारिक नेत्यांमध्ये होत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
सुरुलातीला स्थानिक पातळीवरील मुद्दे व वैयक्तिक टीकाटिप्पणीत रंगलेल्या या निवडणुकीने आता मात्र पवार विरुध्द विखे असे वळण घेतले आहे. त्याची सुरुवात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शरद पवार यांनी नगर जिल्ह्यासाठी काय केले, केवळ भांडणे लावून जिल्ह्याचे वाटोळे केले असा आरोप करुन केली. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील समुद्राला वाहून जाणारे पश्चिम वाहिन्यांचे पाणी, पुर्वेला गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या बाळासाहेब विखे यांच्या आराखड्यास केवळ श्रेय मिळू न देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी विरोध केल्याचा दावाही त्यांनी केला.
हेही वाचा : “मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?
त्याला शरद पवार यांनी जाहीर सभेतून प्रत्युत्तर दिले. पहिल्यांदा खासदार होताना बाळासाहेब विखे हे भाऊसाहेब थोरात (माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे वडील) यांच्या विरोधाला घाबरुन आपल्याकडे आले होते. आपणच त्यांना थोरात यांच्याकडे घेऊन गेलो. थोरात यांनी मनाचा मोठेपणा दाखवत विखे यांना माफ केला व विखे यांच्या संसदेतील प्रवेशाचा रस्ता मोकळा केला, या सहकार्याची जाणीव विखे यांना राहिली नसल्याचे सूचित केले.
नगर मतदारसंघात सुजय विखे विरुद्ध नीलेश लंके यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी महसूल मंत्री विखे यांनी मुंबईतील एका उद्योगपतीला आपल्याकडे पाठवल्याचा, लंके यांच्या उमेदवारीने विखे यांची झोप उडाल्याचा पलटवारही पवार यांनी नगरच्या सभेत केला. विखे यांच्यामध्ये माणूसकी राहिली नाही असा थेट हल्लाबोल पवार यांच्याकडून झाल्याने निवडणुकीला पवार विरुध्द विखे असे वळण पुन्हा प्राप्त झाले.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींना पर्याय कोण? महाराष्ट्रातील जनतेच्या काय आहेत भावना?
पवार खोटं बोलतात, पण रेटून बोलतात, त्यांनी लेकीच्या बारामतीमधील पराभवाची चिंता करावी, असे प्रत्युत्तर राधाकृष्ण विखे यांनी दिले. खरेतर मतदारसंघातील मुद्याऐवजी निवडणूक, मी व पवार यांच्यावर आरोप करत वेगळ्या वळणावर नेली जाईल, असा इशारा विखे यांचे पारंपारिक विरोधक बाळासाहेब थोरात यांनी दिला होता. पवार व थोरात यांच्यात विलक्षण सख्य असूनही पवार यांनी त्यांचा सल्ला मानलेला दिसत नाही..
निकराची लढत
शरद पवार व बाळासाहेब विखे या दोन नेत्यांमध्ये सुरुवातीच्या काळापासून सूरू झालेल्या राजकीय संघर्षास १९९१ मधील विखे-गडाख निवडणूक खटल्याने वेगळे परिमाण दिले. आताही नगर मतदारसंघात पूर्वनियोजितपणे नीलेश लंके यांच्या उमेदवारीचे सुतोवाच वर्षापूर्वीच शरद पवार यांनी केले होते. अजितदादा गटात गेलेल्या लंके यांना पुन्हा आपल्याकडे वळवत पवार यांनी विखे विरोधात निकराची लढत उभी केल्याने, पवार-विखे वाद वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. आगामी प्रचार काळात तो पुन्हा कोणती वळणे घेतो, हे पाहणे रंजक ठरेल.