निवडणूक रोख्यांचा तपशील सार्वजनिक झाल्यानंतर रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोणत्या कंपन्यांनी कोणत्या राजकीय पक्षांना निधी दिला आहे हे रोख्यांच्या तपशीलावरूनही उघड झाले आहे. यात निवडणूक रोख्यांच्या यादीत चेन्नई सुपर किंग्जचे नावही आले आहे. चेन्नई सुपर किंग्ज ‘चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेड’ नावाची कंपनी चालवते, ज्याची मूळ कंपनी इंडिया सिमेंट आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा सध्याचा कर्णधार आहे. धोनीच्या संघाची मालकी असलेल्या कंपनीने तामिळनाडूच्या ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम म्हणजेच AIADMK ला निवडणूक रोख्यांद्वारे पैसे दिले आहेत. रिपोर्टनुसार, एआयएडीएमकेला निवडणूक रोख्यांद्वारे ६.०५ कोटी रुपये मिळाले आहेत. यातील बहुतेक पैसे चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट लिमिटेडकडून आले आहेत.

चेन्नई सुपर किंग्जने AIADMK ला किती पैसे दिले?

‘चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेड’ने दोन दिवसांत AIADMK ला ५ कोटी रुपयांचा निधी हस्तांतरित केला होता. खरं तर हे पैसे २०१९ मध्ये २ ते ४ एप्रिल दरम्यान देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जकडून पक्षाला एकही पैसा मिळालेला नाही. निवडणूक आयोगाच्या निवडणूक खर्च विभागाच्या सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाला कोईम्बतूरस्थित लक्ष्मी मशीन वर्क्स लिमिटेडकडून एक कोटी रुपये आणि चेन्नईस्थित गोपाल श्रीनिवासन यांच्याकडून ५ लाख रुपये राजकीय देणगी म्हणून मिळाले आहेत. योगायोगाने पक्षाने २०१९ मध्ये दोनदा हीच माहिती दिली होती. TVS ग्रुपच्या गोपाल श्रीनिवासन यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे एआयएडीएमकेला तेव्हा मदत मिळाली होती. सार्वजनिक केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, AIADMK ला ३८ निवडणूक रोखे मिळाले आहेत, ज्यात CSK कडून २९ आणि TVS च्या श्रीनिवासन यांच्याकडील ५ रोख्यांचा समावेश होता. तसेच हे निवडणूक रोखे १५ एप्रिल २०१९ रोजी जमा करण्यात आले आहेत. CSK च्या रोख्यांपैकी प्रत्येकाची किंमत १० लाखांहून जास्त होती. पक्षाला एप्रिल २०१९ मध्ये मिळालेल्या ६.०५ कोटी रुपयांमध्ये हे सर्वाधिक होते.

हेही वाचाः राणांसमोर घटक पक्षांची एकजूट राखण्‍याचे आव्‍हान

२०११ ते २०२१ मध्ये तामिळनाडू राज्यात चांगली ताकद असतानाही AIADMK ला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आणि २०२१ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात वाईट निवडणूक निकालांना सामोरे जावे लागले होते. २०१६ मध्ये जयललिता यांचं निधन झाल्यानंतर पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती. २०१७ ला सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वामी यांच्या नेतृत्वात पुन्हा एआयएडीएमके पक्ष एकत्र आला. एआयएडीएमके पक्षाच्या निवडणूक रोख्यांमध्ये सीएसकेचा मोठा वाटा आहे. पलानीस्वामी यांची सीएसके आणि श्रीनिवासन यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aidmk party gets maximum electoral support from mahendra singh dhoni chennai super kings vrd